वसुबारसाच्या दिवशी कशी करावी गोमातेची पूजा? जाणून घ्या..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळी हा सणच मुळी दिव्यांचा आहे, म्हणून सर्वजण आपापल्या दारासमोर पणत्या लावतात. अंगणात रांगोळ्या काढतात कोणी ठिपक्यांच्या काढून यात आकर्षक रंग भरतात. कोणी फुलांची, तर कोणी धान्याची रांगोळी काढतात. रांगोळ्यांमुळे अंगी असलेली कला दाखवण्यास वाव मिळतो. प्रत्येकाच्या दारावर वेगवेगळ्या आकारातील आकाशकंदील लावलेले असतात सुबक रांगोळ्या, टांगलेले आकाशकंदील, तेवणाऱ्या पणत्या आणि फटाक्यांची, रोषणाई, यामुळे सगळे वातावरण उत्साही आणि आनंदी होते. लहान मुले मातीचे किल्ले बांधतात. वर्षभराचे कष्ट विसरून आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.

गायी - गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. हिंदुस्थानी संस्कृतीत गोमातेला फार महत्त्व आहे. ‘वसुबारस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या दिवाळीच्या या पहिल्या दिवसाचे नाव संस्कृतमध्ये गोवत्स द्वादशी असं आहे. अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्स द्वादशी. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त सहा ते सव्वासहाच्या दरम्यान असल्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या थोडेसे आधीच साडेपाच पावणेसहापूर्वीच सर्व गोशाळा (गोठे) स्वच्छ करून रांगोळ्या, तोरणे यांनी सजवून, पणत्या, दीपमाला यांनी प्रकाशित करून मोठ्या प्रेमाने, आदराने आणि भक्तीने गायवासरू पूजन करायचे आहे. यावेळी ताम्रकलश (तांब्याचा लोटा, ताम्रपत्र, तांब्याच फुलपात्र, पंचपात्री, पेला) पाण्याने भरून घेऊन गायवासरांच्या पायावर (डाव्या हातातील पाणी उजव्या हातातून) पाणी सोडावे यालाच म्हणतात अर्घ्य.

हे अर्घ्य देताना म्हणवायचा मंत्र असा :

क्षीरोदार्णव- संभूते सुरसुर- नमस्कृते ।
सर्व-देव मये मातर गृहाण अर्घ्य नमोस्तुते ।।

अर्थ - क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा (कामधेनू) माते, मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर तुला आमचे अनंत प्रणाम !

ज्या गायवासरांचे पूजन करायचे ती शक्य तर एका वर्णाची असावीत. गाय भरपुर दूध देणारी असावी. तिची गंध, कुंकूम, अक्षता वाहून, पुष्पहार घालून आणि अर्घ्य देऊन पूजा केल्यावर तिला उडीद वडे (कानडी भाषेतील मेदूवडा) खायला घालावेत. या वेळी गोमातेची प्रार्थना करावी.

सर्व-देव-मये देवि । सर्व-देवैर अलंकृते ।
मातर मम अभिषितं सफलं कुरु नन्दिनी ।।

अर्थ - सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते! सर्वदेव तुझ्या ठायी निवास करतात. म्हणून तू सर्वदेवमयी सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे. तेव्हा हे आई आमच्या ईच्छा पूर्ण कर.

या दिवशी आपण गायीचे दूध, दही, तूप, ताक; तसेच तेलात तळलेले वडे इ. पदार्थ वर्ज्य करावेत. याच गोवत्स द्वादशी- वसुबारसेपासून पाच दिवस (पाडव्यापर्यंत) देव, विद्वान, गुरुजन, गायी, घोडे, वडीलधारी मंडळी, मुलेबाळे या सर्वांचे घरातील माताभगिनींनी नीरांजनाने ओवाळून औक्षण दीर्घायुष्यचिंतन करावे असे नारदवचन आहे.

दिन-दिन दिवाळी । गाईम्हशी ओवाळी ।
गाई म्हशी कोणाच्या । गाई म्हशी लक्ष्मणाच्या ।।

याच वेळी बाळगोपाल आनंदित होऊन फुलबाज्या गोल गोल फिरवून गाणे म्हणत असतात. या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. घरावर आकाशकंदील लावतात. स्त्रिया अंगणातील तुळशी वृंदावनापुढे पणती लावतात. सर्व घरांमध्ये लाडू, करंज्या, चकल्या, शेव, चिवडा असे पदार्थ केले जातात.

- निळकंठ कुलकर्णी
(kulkarninilkanth4@gmail.com)
(स्त्रोत, साभार : सामना)

Post a Comment

Previous Post Next Post