मतदार यादीत नाव नाही? दुरुस्ती करायचीय? विशेष मोहिमेतून मिळणार संधी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जिल्ह्याच्या मतदार यादीत स्त्री व पुरुषांचे प्रमाण व्यस्त असल्याने जिल्हा प्रशासनाद्वारे महिला व युवक मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदार यादीत १ हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांची नावे अवघी ९२३ आहेत. त्यामुळे महिलांची नावे मतदार यादीत नोंदवण्यासाठी गावा-गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व महिला बचत गट सदस्य महिलांना जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींची मतदार नोंदणी होण्यासाठी हे विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर त्यांच्या नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवती व महिलांची नावे मतदार यादीत नोंदवण्याचे काम या मंडळींना करावे लागणार आहे. या मोहिमेच्या निमित्ताने नवीन मतदार नोंदणी, यादीतील दुरुस्तीसाठी संधी मिळाली आहे.

अहमदनगर जिल्ह्याची आजची एकूण मतदारसंख्या ३४ लाख ९१ हजार ६९७ आहे. नव्या मतदारांचे नाव समाविष्ट करणे, दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची तसेच मृत व्यक्तींची व स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळण्याचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी-जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी हाती घेतला आहे. जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम होत असून, यासाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघांतील ३ हजार ७२२ मतदान केंद्रांवर विशेष सुविधा केली गेली आहे. या मतदान केंद्रावर प्रत्येकी एक बीएलओ म्हणजे ३ हजार ७२२ बीएलओ व ३५४ बीएलओ सुपरवायझर नियुक्त केले गेले आहेत. मतदार यादी अद्ययावत होण्यासाठी राजकीय पक्षांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याने या मोहिमेत राजकीय पक्षांनीही सहभागी होऊन मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमून सहकार्य करण्याचेही आवाहन केले गेले आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम येत्या १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान आलेल्या हरकती व सूचनानुसार आवश्यक दुरुस्ती करून १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

नागरिकांनी काय करावे..
  • प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी.
  • १ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे होत आहे, अशांनी आपले नाव मतदार यादीत येण्यासाठी नमुना-६ अर्ज आवश्यक पुराव्यासह माहिती भरून आपल्या परिसरातील मतदान केंद्रावर द्यावा.
  • मतदार यादीतील आपल्या नावात (नाव, वय, लिंग, फोटो) काही चुका असल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी नमुना-८ अर्ज भरून द्यावा.
  • मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी संबंधितांच्या मृत्यू दाखल्यासह नमुना-७ अर्ज भरून द्यावा.
  • दोन वा त्यापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ मतदार यादीत नावे असलेल्या (दुबार नावे) मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणच्या यादीत नाव ठेवून अन्य ठिकाणची नावे वगळण्याबाबत नमुना-७ अर्ज भरून द्यावा.
  • बदली वा अन्य कारणाने स्थलांतर झालेल्यांनी येथील आपले नाव वगळून नव्या ठिकाणी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे.
  • मतदार यादीमधील आपल्या नावासमोर आपला फोटो नसेल अशा मतदारांनी आपला पासपोर्ट साईज फोटो आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावरील बीएलओ (केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याकडे जमा करावा.

Post a Comment

Previous Post Next Post