सर्वात आधी 'वडापाव' कुठे आणि केव्हा बनविला गेला?

जाणून घ्या वडापावची उगमकथा..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
 
मुंबईच्या लोकांचा जर सर्वांत जास्त आवडता खाद्यपदार्थ कुठला असेल तर तो नक्कीच वडापाव हा आहे. साधारणतः १० रुपयांपासून विकल्या जाणाऱ्या आणि भुकेला साथ देणाऱ्या वडापावच्या शोधाचे श्रेय हे अशोक वैद्य ह्यांना जाते.


इ. स. १९६६ साली दादर रेल्वे स्टेशनजवळ एक छोटेसे दुकान चालविणाऱ्या अशोक वैद्य ह्यांच्या मनात त्यांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात थोडा वेगळा प्रयोग करण्याची इच्छा झाली. त्यांनी बटाटा वडा आणि पाव ह्यांना एकत्र करून एक नवीन पदार्थ बनविला आणि विकण्यास सुरुवात केली, हाच खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. हळू हळू वडापाव लोकप्रिय होऊ लागला आणि आजूबाजूच्या दुकानदारांनी अशोक ह्यांचा पावलावर पाऊल ठेऊन वडापाव विकण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वडापाव हळू हळू प्रसिद्ध होऊन सर्वदूर पसरला.

इ. स. १९९८ मध्ये अशोक वैद्य ह्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातले सर्व जण चांगल्या ठिकाणी कामधंद्याला असून पण अजूनपर्यंत दादर मधील दुकान चालवतात. जवळपास ५२ वर्षांपासून वैद्य ह्यांच्या वडापाव बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीच बदल झाला नाही आहे. आता त्यांची बायको मंगल आणि मुलगा नरेंद्र सकाळी ४ वाजता उठून वडापाव बनवायला सुरुवात करतात.

अशोक वैद्य हे एक निस्सीम शिवसैनिक होते. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते दुकान चालवायचे तेव्हा त्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जायचा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांना जेव्हा हे समजले, तेव्हा ते दादर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक सरकारी कार्यालयामध्ये गेले आणि अशोक वैद्य ह्यांना त्रास न देण्याबद्दल सूचना देऊन आले. वैद्य कुटुंब हे शिवसेनेने आजपर्यंत केलेल्या मदतीबद्दल ऋणी आहे.

जर तुम्हाला महाराष्ट्राचा अस्सल आणि मूळ वडापाव खायचा आहे तर दादर स्टेशनच्या पश्चिम मार्गावरील प्लॅटफॉर्म नंबर १ च्या बाहेर वैद्य ह्यांचे दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही चव बघू शकता.

(कोरा या संकेतस्थळावर महेंद्र राऊत यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post