कॉन्टिनेंटल फूड म्हणजे काय प्रकार आहे? यात कोणते पदार्थ येतात?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कॉन्टिनेंटल फूड ही तशी वेगळी कनसेप्ट वाटते. पण ती एक संस्कृती आहे. काही ठरावीक वैशिष्ट्ये असल्यामुळे पाश्चिमात्य पाककृती ही भारतीय आणि आशियाई खाद्यसंस्कृतीपेक्षा वेगळी ठरते.

मांसाहार हा पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीत मुख्य घटक आहे. स्टेक (मांसाचा किंवा माशाचा भाजलेला मोठा तुकडा) हा पदार्थ सर्व पाश्चिमात्य देशांत आढळून येतो. पाश्चिमात्य देशात खाद्यपदार्थाची रुची वाढवण्याकरिता सॉसेसचा वापर करण्यावर भर असतो. बरेच दुग्धजन्य पदार्थही पाककृतीची गोडी वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. गव्हाचा ब्रेड, पास्ता आणि पेस्ट्रीजसोबत बटाट्याचा वापर सामान्यत: स्टार्च म्हणून युरोपात केला जातो.

जागतिकीकरणामुळे आपण वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेऊ लागलोय. पण पूर्वीचे लोक काय खात असतील? त्यांनी हे खाद्यपदार्थ कसे तयार केले असतील? यापैकी काही पदार्थ इतके प्राचीन आहेत, की त्यांची सुरुवात कोठे झाली हे सांगता येत नाही. पण हे पदार्थ पूर्वापार चालत आले आहेत.

50 आणि 60 च्या दशकात भारतात युरोपातील खाद्यपदार्थ प्रामुख्याने काँटिनेंटल फूड म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर प्रत्येक देशानुसार जसे की फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, ग्रीक पदार्थ विशिष्ट चवीनुसार स्वतचे वेगळेपण घेऊन पुढे आले.

काँटिनेंटल फूडमध्ये इस्पॉनिऑल, वॅलूते, मेयोनीज, हॉलंडेज, बॅश्मेल हे पाच मुख्य सॉसेस असतात. त्यातील मेयोनीज हा व्हाईट सॉस तसा परिचयाचा आहे. तर इस्पॉनिऑल म्हणजे आपण जो ब्राऊन सॉस म्हणून ओळखतो तोच असतो. वॅलूते हा सॉस चिकन आणि फिश स्टॉकिंगसाठी वापरतात. तर हॉलंडेज टॉिपगसाठी वापरला जातो. बॅश्मेल हा व्हाईट सॉस असून तो बनवावा लागतो.

बहुतांश काँटिनेंटल पदार्थ हे या पाच बेसिक सॉसेसपासून बनवले जातात. यापैकी बॅश्मेल हा सॉस सोडून बाकी सगळे सॉस बाजारात उपलब्ध आहेत.

बेक्ड व्हेजिटेबल, लझानी, मुसाका, फिश म्युनिअर (यात मासे, मीठ आणि मिरपूड, लिंबू यात मॅरिनेट करून मैदा लावून ते बटर घालून ग्रील केले जातात) हे पदार्थ अजूनही लोकप्रिय आहेत. तर रशियन डिश – चिकन स्टॉगनॉफ, लॉबस्टर थेर्मीडोर हे काँटिनेंटल पदार्थ 90 च्या दशकात लोकप्रिय होते. त्यावेळी ते फक्त पंचतारांकित हॉटेल्स आणि मुंबई, दिल्ली येथील काही निवडक उच्चभ्रू रेस्टॉरंट्समध्ये चाखायला मिळत असत. जसा काळ लोटला तसे क्यूझीनमध्ये वेगळेपणा जाणवू लागला आणि काँटिनेंटल फूड आधुनिक पाश्चात्त्य खाद्यप्रकार म्हणून ओळखला जाऊ लागला. जगभरातील क्रूझ आणि फाइन डाइन रेस्टॉरंट्समध्ये काम करून तिथला अनुभव घेऊन जेव्हा शेफ्स भारतात परतू लागले तेव्हा काँटिनेंटल फूड भारतात रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध होऊ लागलं. काँटिनेंटल फूड आलं तसं त्याबरोबरचं कल्चर, वाइन टेस्टिंग असे इतर प्रकारही आले. 

(कोरा या संकेतस्थळावर प्रणिता बामणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post