डायलिसिस म्हणजे काय? कशी असते प्रक्रिया?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

एखाद्या व्यक्तीची मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे ती व्यक्ती डायलिसिसवर (व्याश्लेषण) आहे, असं आपण ऐकतो. ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि तिची गरज का पडते? या बाबत
अनेकांचा संभ्रम असतो. काय आहे ही प्रक्रिया, जाणून घेऊया..  

आपल्या शरीरात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधून अनेक टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात. शरीराला अन्न-पाण्याची जितकी गरज आहे, तितकीच गरज शरीरात निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची आहे. कारण हे पदार्थ केवळ शरीराला निरुपयोगीच नसतात तर ते हानीकारक आणि विषारीसुद्धा असतात. जर ते शरीरात साठून राहिले तर नक्कीच त्याचे घटक परिणाम शरीरावर झाल्याचं आपल्याला आढळून येतं. उदाहरणार्थ, आपण जे अन्न खातो ते पचल्यानंतर त्यातले वेगवेगळे घटक एकतर शरीरातल्या पेशींकडून वापरले जातात आणि नाहीतर ते पेशींमध्ये साठवले जातात. पण प्रथिनं मात्र आपल्या शरीरात साठवली जात नाहीत. प्रथिनांच्या पचनातून अमिनो आम्ल तयार होतात. अतिरिक्त अमिनो आम्लांचं रूपांतर युरियामध्ये केलं जातं. ही प्रक्रिया यकृतात घडते. आता आपल्या शरीराच्या दृष्टीने युरिया हा टाकाऊ पदार्थ आहे. यकृतात तयार झालेला हा युरिया रक्तात मिसळतो आणि रक्तावाटे वाहून नेला जातो. युरियासारखे टाकाऊ पदार्थ जसे रक्तावाटे वाहून नेले जातात, तसेच शरीराला उपयुक्त असणारे अनेक पदार्थही त्याच वेळी वाहून नेले जातात. त्यामुळे रक्तातले उपयुक्त घटक तसेच ठेवून युरियासारख्या टाकाऊ पदार्थाना वेगळं करण्याचं काम मूत्रिपडे करतात. रक्तातून वेगळ्या केलेल्या टाकाऊ पदार्थाचं मूत्र बनतं. ते मूत्राशयात जमा करून शरीराबाहेर टाकलं जातं.

जर रक्तातून युरिया वेगळा केला गेला नाही तर रक्तातलं युरियाचं प्रमाण वाढत जातं. याला ‘युरेमिया’ असं म्हणतात. मूत्रिपिंड निकामी झालेल्या व्यक्तीमध्ये नेमकं हेच घडतं. म्हणून एखाद्या व्यक्तीची मूत्रिपडे निकामी झाली तर डायलिसिस किंवा व्याश्लेषण प्रक्रियेने रक्तातला युरिया वेगळा केला जातो. या प्रक्रियेत शरीरातलं रक्त एका कृत्रिम उपकरणातून प्रवाहित करून चक्क गाळलं जातं आणि युरिया वेगळं केलेलं रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं. म्हणजेच जे काम मूत्रिपडे करतात, ते काम यंत्राद्वारे घडवून आणलं जातं. यालाच डायलिसिस असे म्हणतात.

(कोरा या संकेतस्थळावर वैभव पेंढारे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post