मानवाच्या शरीरात नवीन पेशी कशा निर्माण होतात?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नवीन पेशी ह्या केवळ अस्तित्वात असलेल्या जुन्या पेशींमधूनच जन्माला येतात. शुक्राणूद्वारे फलित झालेल्या स्त्रीबीजास इंग्रजीत झायगोट (zygote) असे नाव आहे. ह्या झायगोटचे सलग असंख्यवेळा विभाजन होऊन त्यातून निर्माण झालेल्या अब्जावधी पेशींतून मानवदेह आकारास येतो. शरीराची आणि आतील अवयवांची पूर्ण वाढ होईपर्यंत ही प्रक्रिया चालते.

नवीन पेशी निर्माण होण्याच्या प्रक्रियेला पेशी विभाजन (cell division) म्हणतात. ही प्रक्रिया दोन प्रकारची असू शकते - मायटॉसिस आणि मीऑसिस. दोन्ही प्रक्रिया नवीन पेशींना जन्म देतात पण त्या पेशी जनुकीयदृष्टया वेगळ्या असतात.

मायटॉसिस (mitosis) - शरीतातील बहुतांश पेशी ह्या प्रक्रियेतून जन्माला येतात. नवीन पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या मूळपेशीएवढीच असते. प्राण्याचे संपूर्ण शरीर आणि वेगवेगळे अवयव ह्या प्रक्रियेतून बनतात.

मीऑसिस (meiosis) - ही प्रक्रिया केवळ संतती उत्पत्तीसाठी महत्वाची असते. मानवाचे अंडकोष/वृषण आणि अंडाशय ह्यांमध्ये अशा प्रकारच्या पेशीविभाजनातून शुक्रजंतू आणि स्त्रीबीजाची निर्मिती होते, ज्यांमध्ये गुणसूत्रांची संख्या शरीरातील इतर पेशींपेक्षा अर्धी असते. जन्माला येणाऱ्या बाळाला अशाप्रकारे त्याची अर्धी गुणसूत्रे आईकडून तर अर्धी वडिलांकडून मिळतात. शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर पेशी विभाजन थांबते.

नवीन पेशी कोठे निर्माण होतात?
पूर्ण वाढ झालेल्या शरीरात केवळ काही ठिकाणी नवीन पेशी निर्माण होत असतात. 

त्वचा - त्वचेच्या सगळ्यात वरच्या थरातील पेशी जीर्ण होऊन वरचेवर त्वचेपासून वेगळ्या होत असल्यामुळे खालच्या थरातील पेशी विभाजित होऊन नवीन पेशींची निर्मिती सतत करत असतात. जठराच्या आणि आतड्याच्या आतील आवरणाबाबतीतही असेच घडत असते.

रक्त - रक्तातील विविध प्रकारच्या पेशी अस्थिमज्जेत निर्माण होतात. रक्तपेशींचे आयुर्मान ठराविक काळापुरतेच असते (लाल रक्तपेशींचे साधारणपणे ३ ते ४ मास आणि पांढऱ्या रक्तपेशींचे १३-२० दिवस). त्यामुळे अस्थिमज्जेतील पेशी सतत मायटॉसिस द्वारे नव्या पेशी बनवत असतात.

प्रौढावस्थेनंतर पुरुषाच्या वृषणांमध्ये सतत पेशीविभाजन होत असते.

प्रौढावस्थेनंतर स्त्रीच्या अंडाशयांमध्ये आंशिक पेशीविभाजन होत असते.

पूर्ण वाढ झालेल्या यकृतात पेशीविभाजन थांबते. पण अपघातात किंवा इतर कारणामुळे यकृतास थोडीफार इजा झाल्यास थोड्या प्रमाणात पेशी विभाजन होऊन ते परत बरे होऊ शकते.

मेंदू, हृदय, स्वादुपिंड, पाठीचा कणा इत्यादींस इजा झाल्यास तेथील पेशी कायमच्या मरतात आणि पुनः निर्माण होत नाहीत.

पूर्ण वाढ झाल्यानंतर शरीरात ज्या अवयवांमध्ये पेशी विभाजन होऊ शकते (सतत किंवा विशेष कारणांमुळे), तिथे सामान्यतः स्टेम पेशी (stem cell) नावाच्या पेशी उपस्थित असतात.

मृत झालेल्या पेशींचे काय होते?
जीर्ण झालेल्या किंवा व्यवस्थित कार्य करण्यास अक्षम असलेल्या पेशी सुनियोजित पेशीमरण (programmed cell death-apoptosis) ह्या प्रक्रियेद्वारे नष्ट केल्या जातात आणि त्यांच्या विघटनातून मिळालेले वापरण्यायोग्य पदार्थ आणि जैवरसायने इतर पेशींच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात. लाल रक्तपेशी प्लीहेत नष्ट केल्या जातात आणि त्यांतून मिळणारे लौह अंश नवीन रक्तपेशींसाठी हीमोग्लोबिन बनविण्याकरिता वापरले जाते.

(प्राणिशास्त्र संशोधक सुरज डबिरे यांनी कोरा या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post