आता नाही ब्युटीपार्लरची गरज; घरीच तयार करा ‘हे’ फेसपॅक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सौंदर्यामधील महत्त्वाचा घटक म्हणजे आपली त्वचा. त्वचा जर नितळ, मुलायम असले तर सहाजिकच आपलं सौंदर्य आणखी खुलून येतं. मात्र प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगवेगळा असतो. काहींची त्वचा खूप कोरडी तर काहींची तेलकट असते. त्यातच आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे चेहऱ्याची आणि शरीराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. चेहऱ्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात थंडावा देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे बऱ्याच वेळा मुली बाजारात मिळणाऱ्या फेसपॅकचा वापर करतात. परंतु काही फेसपॅकमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात आला असतो ज्यामुळे त्वचेला इजा पोहचू शकते. त्यामुळे बाजारातून विकत आणलेल्या फेसपॅकपेक्षा घरीच तयार केलेला फेसपॅक कधीही चांगलाच. असेच काही सहज-सोपे आणि घरच्या घरी करता येणारे फेसपॅक..

१. काकडीचा फेसपॅक – काकडीमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. कोरड्या त्वचेची समस्या असणाऱ्या महिलांसाठी काकडीपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक अत्यंत उपयुक्त ठरतो. काकडीचा रस त्वचेचा कोरडेपणा दूर करतो. याशिवाय काकडी त्वचेची जळजळ शांत करण्यात मदत करते. त्वचेवरील फुगवटा कमी करते.त्यामुळे काकडीचा फेसपॅक लावणं कधीही उत्तम.

अर्धी काकडी चांगली किसून त्यात दोन चमचे साखर घ्याला. हे मिश्रण फ्रिजमध्ये गार होईपर्यंत ठेवा. त्यानंतर चेहऱ्याला लावून काही मिनिटांनी मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेला मळ दूर होईल तसेच कोरड्या त्वचेची समस्याही दूर होईल.

२. टोमॅटो-मध फेसपॅक – चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळ दिसेल.

३. टरबूज फेसपॅक – टरबूजचा रस आणि काकडीचा रस एकत्रित करून घ्या. या मिश्रणात बदामाची पूड आणि दही घालून त्याचा लेप तयार करा. हा लेप चेहऱ्यावर किंवा हात-पायांवर लावा. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा चमकदार दिसू लागते.

४. केळ्यांचा फेसपॅक – केळ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर अनेक गुणधर्म असतात. तसेच केळी त्वचेसाठी आरोग्यदायी ठरतात. यासाठी एक केळ घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइल आणि मध एकत्र करून फेसपॅक तयार करा. हे मिश्रण १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेतील कोरडेपणा दूर होतो.

५. नारळाचे तेल – नारळाच्या तेलामध्ये मध, ¼ सफरचंदाचा रस आणि व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण केसाला लावा. त्यानंतर तीस मिनिटाने केस धुवून घ्या. यामुळे केसांची वाढ आणि बॅक्टेरियाच्या वाढीपासून केसांचा बचाव होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post