'त्या' परीक्षेची स्पष्टता अजूनही नाही, पण अर्ज भरण्यास होणार सुरुवात

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बारावी परीक्षेबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येत आहे. परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ( www.mahahsscboard.in) या संकेतस्थळावर भरायचे आहेत. मात्र, परीक्षा कधी होणार याची अद्याप स्पष्टता नाहीय.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० परीक्षांचे निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून १५ डिसेंबर २०२० पासून ४ जानेवारी २०२१ पर्यंत भरायचे आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी ५ ते १८ जानेवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगीनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री-लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे.

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. नव्याने अर्ज क्रमांक १७ द्वारे नोंदणी करणार्‍या खासगी विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाच्या बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखा अशा- नियमित विद्यार्थी - १५ डिसेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१. व्यवसाय अभ्यासक्रमाचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थी- ५ ते १८ जानेवारी २०२१.

Post a Comment

Previous Post Next Post