पोलिसांना गुंगारा देणारा 'तो' अखेर सापडला


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन लुटणारा व नंतर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होणारा दरोडेखोर जावेद घड्याळ्या चव्हाण (वय 35, रा. सुरेगाव) याला अखेर श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याला पकडल्याने अनेक गुन्हे उघडकीस येणार आहे. त्याच्याबरोबरच बाबूश्या चिंगळ्या काळे (वय19, रा. वांगदरी) यालाही पोलिसांनी पकडले आहे.

20ऑगस्ट रोजी जावेद व त्याच्या साथीदारांनी जळगाव जिल्ह्यातील महिला व पुरुषांना विसापूर फाटा येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले होते व त्यानंतर त्यांच्यावर दरोडा टाकून त्यांच्याकडील 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत बेलवंडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. विसापूर फाट्यावर झालेल्या या दरोड्यादरम्यान जावेदच्या चार साथीदारांचा खून झाला होता, तेव्हापासून जावेद फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. 19 डिसेंबरला श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना जावेद हा सुरेगाव परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यानंतर ढिकले यांनी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, संजय काळे, गोकुळ इंगवले, दादा टाके, किरण बोराडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल लता पुराणे यांच्या पथकाने त्या परिसरात विशेष तपास मोहीम राबवून जावेद घडयाळ्या चव्हाण व बबूश्या चिंगळ्या काळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त केली. ही दुचाकी त्यांनी पुणे जिल्ह्यातील यवत येथून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. हे दोन्ही आरोपी अट्टल दरोडेखोर असून त्यांच्याविरोधात श्रीगोंदा, पारनेर, सुपा, नारायणगाव,लोणीकाळभोर,यवत या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे हे गुन्हे उलगडण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post