नगर जिल्ह्यात बेडकांचे 'डराव...डराव'; सर्वेक्षणात आढळले दुर्मिळ बेडुक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर जिल्हा निसर्गप्रेमी व जैवविविधता संशोधन आणि संवर्धन केंद्राच्यावतीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्ह्यात उभयचर प्राणी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात बेडकांच्या डराव.. डरावचा आवाज त्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. आगळेवेगळे व दुर्मिळ प्रजातीचे बेडूक (फ्रॉग) जिल्ह्यात असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून स्पष्ट झाला.

या विशेष सर्वेक्षण उपक्रमात आशा कसबे यांनी घेतलेली बलुन फ्रॉगची नोंद, तर भट्टीवाडी(करंजी) येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेली फन्गॉईड व देशातील सर्वात मोठ्या आकाराच्या इंडियन बुलफ्रॉगची नोंद, रवींद्र गोल्हार यांनी घेतलेली कॉमन ट्री फ्रॉगची नोंद तसेच स्नेहा ढाकणे यांनी घेतलेली राईस फ्रॉगची नोंद... अशा नोंदी या वर्षीच्या सर्वेक्षणातील वैशिष्ट्यपूर्ण व महत्वाच्या ठरल्या. याशिवाय प्रतिम ढगे,अमित गायकवाड,शिवकुमार वाघुंबरे,सचिन चव्हाण,संदीप राठोड,अक्षय पाभारे,संजय बोकंद,खुशाल शिंदे,विठ्ठल पवार,संदीप फंड,विजय परदेशी या काही मुख्य निरीक्षकांनीही या उपक्रमात बेडकांविषयी मोलाच्या नोंदी नोंदवल्या.

निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा बेडूक सर्वेक्षण उपक्रम झाला. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पाणथळ ठिकाणी तसेच आपल्या परिसरात आढळणार्‍या बेडकांची छायाचित्रे संकलित केली गेली. या सर्वेक्षणात जिल्हाभरातील सुमारे २५ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. या मंडळींनी वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ३१पेक्षा अधिक प्रजातींच्या बेडकांची नोंद घेतली.या उपक्रमात आढळून आलेल्या वैविध्यपूर्ण बेडकांची अचुक ओळख पटवण्याचे व त्यांच्याबाबत अधिक सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्याचे कार्य राज्यातील प्रसिद्ध उभयचर प्राणी अभ्यासक डॉ. वरद गिरी व प्राणीशास्त्रज्ञ डॉ. सुमन पवार यांनी केले.

या सर्वेक्षणाबाबत निसर्ग अभ्यासक सातपुते यांनी सांगितले की, सर्वप्रथम पृथ्वीवर पाण्यात जलचरांच्या रुपाने जीवसृष्टीचा उगम झाला. उभयचर वर्गीय प्राणी हे जलचर व भुचर प्राण्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहेत. निसर्गचक्रात या उभयचरांना महत्वाचे स्थान असुनही हा घटक मात्र दुर्लक्षितच राहतो. या घटकांवरही जाणीवपुर्वक अभ्यास,निरीक्षण व नोंदी होणे अतिशय गरजेचे आहे. या उद्देशाने या उपक्रमाचे जिल्ह्यात आयोजन केले गेले. अशा या आगळ्या वेगळ्या या उपक्रमांची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यापासून होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. दरम्य़ान, बेडूक सर्वेक्षणाचा असा हा आगळा वेगळा उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला असुन निसर्गप्रेमी व अभ्यासक वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.या उपक्रमासाठी जिल्हा उपवन संरक्षक अधिकारी एम.आदर्श रेड्डी यांचेही सहकार्य लाभले असुन या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वांना त्यांच्या स्वाक्षरीचे सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post