आनंदधाम साधनास्थळाला कलंक? साध्वीजींना बाहेर काढण्याचा झाला प्रयत्न?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगरसह आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रद्धेय असलेल्या जैनमुनी-आचार्यसम्राट आनंदऋषी महाराज यांनी आयुष्यभर जेथे साधना केली व जेथे त्यांचे स्मृतिस्थळ आहे, त्या आनंदधाम-धार्मिक परीक्षा बोर्ड परिसराला कलंक लागेल, अशी घटना शनिवारी सायंकाळी घडल्याचे सांगितले जाते. लॉकडाऊनमुळे नगरला अडकून पडलेल्या साध्वीजींना येथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांची भांडी व अन्य साहित्यही खोलीबाहेर काढले गेल्याने संबंधित साध्वीजींनी कोतवाली पोलिसांना बोलावले. पोलिसांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, धार्मिक परीक्षा बोर्डाच्या विश्वस्तांची भूमिका पोलिस जाणून घेणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, या प्रकाराची जोरदार चर्चा जैन भाविकांमध्ये असून, पोलिस आता याबाबत काय भूमिका घेतात व त्या साध्वीजींकडून विश्वस्तांविरुद्ध पोलिसात लेखी तक्रार होते काय व पोलिस गुन्हा दाखल करतात काय, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.

जैनमुनी-आचार्यसम्राट आनंदऋषीजी महाराज यांचे सर्वाधिक वास्तव्य नगरमध्ये झाले. त्यांचे स्मृतिस्थळही नगरला आहे. त्यामुळे देशविदेशातील जैन भाविकांच्यादृष्टीने नगरचे आनंदधाम पवित्रस्थळ आहे. त्यामुळे नेहमी येथे भाविकांची गर्दी असते. तसेच देशभरातील विविध जैनस्थानकांत असलेल्या जैन साध्वीजी व जैनमुनी गुरुवर्य आनंदऋषींच्या समाधीस्थळी येऊन धार्मिक साधना करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अनेक जैन साध्वीजी व जैन मुनी आनंदधामच्या परिसरात तसेच भक्त निवासात राहतात. कोरोना लॉकडाऊनच्या आधी अशा साधनेसाठी आलेल्या एका जैन साध्वीजींना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अन्यत्र जाता आले नाही. मागील ७-८ महिन्यांपासून त्या येथेच आहेत. पण त्यांना येथून निघून जाण्याचे सांगण्यात आले, असे सांगितले जाते. कोरोना व लॉकडाऊन सुरू असल्याने मी कोठे जाऊ, असे त्यांचे म्हणणे आहे. या कारणावरून विश्वस्तांपैकी काहीजण त्रास देतात, छळ करतात, अर्वाच्च बोलतात, असा त्यांचा दावा आहे. माझ्यासह अन्य एका साध्वीलाही असाच त्रास दिला जातो व आम्हाला कुलूपबंद केले गेले होते, जेवण व पाणीही दिले जात नव्हते, असे लेखी म्हणणे त्यांनी काही जैन भाविकांना पाठवल्याची चर्चा आहे. 

शनिवारी सायंकाळी काही जणांनी त्यांना खोलीतून बाहेर निघण्यास सांगितले. तसेच त्यांची भांडी व अन्य साहित्यही बाहेर काढले. या प्रकारामुळे त्यांनी लगेच कोतवाली पोलिसांना बोलावले व पोलिसांकडे विश्वस्तांविषयी तक्रार केल्याचे समजते. दरम्यान, याबाबत कोतवाली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 'संबंधित साध्वीजींचे म्हणणे आम्ही (पोलिसांनी) ऐकून घेतले असून, त्यांना आनंदधाममधून निघून जाण्यास काहीजणांकडून सांगितले जाते, त्यावरून त्रास दिला जातो, लॉकडाऊनमुळे त्या येथे अडकल्या आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर आनंदधाम परिसरात ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ साध्वी-मुनींना राहाता येत नाही, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे. साध्वीजींचे म्हणणे आहे की, कोरोना काळात कुठे जाता येत नाही व मी येथून जाणार नाही. अनेकजण अनेक दिवसांपासून येथे राहतात, असेही त्या सांगतात. त्यामुळे त्यांना त्यांची काही तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात येऊन देण्याचे सांगितले आहे. पण त्या अद्याप पोलिस ठाण्यात आल्या नाही व त्यांनी लेखी तक्रार पोलिसात दिली नाही', असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

आनंदधाम स्मृती स्थळाची बदनामी होऊ नये, म्हणून आतापर्यंत गप्प होते. पण आता गप्प राहणार नाही, अशी भूमिका संबंधित साध्वीजींनी घेतली असल्याचे समजते. त्यामुळे शहरातील जैन भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चर्चा शहरात सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post