'तो' अकस्मात मृत्यू नाही.. तर खून.. गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चार वर्षांपूर्वी अकस्मात मृत्यू म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात तो मृत्यू अकस्मात नव्हे तर खून असल्याचे निष्पन्न झाले असून, भिंगार कॅम्प पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भिंगार येथील रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे या 35 वर्षीय व्यक्तीचा झालेला मृत्यू हा विषारी दारू पाजून आणि मारहाण करुन झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर तब्बल चार वर्षांनी चार व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चार वर्षापूर्वी .21 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे (वय 35, रा.द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर, भिंगार) याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी करण्यात आलेले शवविच्छेदन तसेच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेला व्हिसेरा याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि या अकस्मात मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर हा मृत्यू आकस्मात नसून तो खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कॅम्प पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपी जावेद शेख (रा.मोमीन गल्ली, भिंगार) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. यावरुन चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

21 फेब्रुवारी 2017 रोजी आरोपी त्यांच्या घरी आले व आमची बकरी मेलेली आहे ती तुम्हाला देतो, असे सांगून मयत रमेश यास मोटारसायकलवर बसवून काटवनात नेले. तेथे त्याला मारहाण करुन बळजबरीने दारू पाजली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने त्यास नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार चालू असताना तो मयत झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post