तर, काँग्रेस 'लूजर' ठरेल.. 'या' नेत्याने दिला 'महाविकास'ला घरचा आहेर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते फोडायचे नाही, असे ठरले असतानाही राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यात घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याबाबत काँग्रेस नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीत हे प्रश्न विचारायला हवेत. अन्यथा, तीन पक्षांच्या "महाविकास आघाडी सरकार"मध्ये सर्वात मोठा तोट्यातील (लूजर- looser) पक्ष काँग्रेस पक्ष ठरेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी या घटनांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे', असा घरचा आहेर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिला आहे. देशमुखांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे. 

प्रदेश सरचिटणीस देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना खुले पत्र लिहिले असून, ''काँग्रेस जन हो, हीच वेळ आहे जागे होण्याची''...असे आवाहन त्यात केले आहे. व ...''अन्यथा, परिस्थिती आणखी गंभीर होईल''....असा इशाराही दिला आहे. त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'केवळ "महाविकास आघाडी सरकारचा एक भागीदार" आणि त्यातून मिळालेली काही मंत्रीपदे एवढ्यावर समाधानी राहून चालणार नाही. एका बाजूला शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची ताकद तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची आक्रमकता. अशा परिस्थितीत गावोगावचे काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सरकारमध्ये काँग्रेसचाही सहभाग आहे, हे काँग्रेसच्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना जाणवायला हवे. सरकारच्या निर्णयात काँग्रेसच्या ध्येयधोरणांचा प्रभाव दिसायला हवा. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना "शिवसेनेशी जुळवून घ्या", अशा सूचना देण्यात आल्या आणि त्याचदिवशी भिवंडीतील १८ काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा झाला. हा केवळ योगायोग नव्हे. काँग्रेस नेत्यांना या घटनांचा अर्थ नक्कीच समजत असेल', असे सूचक भाष्यही देशमुखांनी यात केले आहे.

यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'काही दिवसांपूर्वी आमच्या नगर जिल्ह्यातील पारनेर येथील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करून या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविले. त्यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील परस्पर संबंधांची चर्चा झाली आणि किमान आपसातील कार्यकर्त्यांचे पक्षांतर टाळले जाण्याची अपेक्षा व्यक्त झाली. मग भिवंडीतील काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कसा काय दिला जातो, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतो', असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, 'याबाबत काँग्रेस नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीत हे प्रश्न विचारायला हवेत. अन्यथा, तीन पक्षांच्या "महाविकास आघाडी सरकार" मध्ये सर्वात मोठा तोट्यातील (looser) पक्ष काँग्रेस पक्ष ठरेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी या घटनांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे', असेही देशमुखांनी यात आवर्जून स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post