'त्या' हॉस्पिटल्सविरोधात कारवाई; मनसेला मनपाचे लेखी आश्वासन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना रुग्णांकडून जास्त घेतलेले पैसे संबंधित रुग्णांना परत करण्याचे शहरातील १४ हॉस्पिटल्सला आदेश दिले असले तरी त्यांच्याकडून तशी कार्यवाही होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तशी लेखी ग्वाही महापालिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली आहे. मनसेचे बुधवारी महापालिकेत या मागणीसाठी झोप-आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला यश आले आहे.

कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतल्याची तक्रार होती. या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे शहानिशा होऊन त्यांच्या तपासणीत जादा आकारणी केल्याचे स्पष्ट झाले व या जादा आकारणीची वसुली करून ते पैसे संबंधित रुग्णालयांना देण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. महापालिकेने त्यानुसार संबंधित रुग्णालयांना नोटिसा दिल्या होत्या व ७ दिवसात पैसे जमा करण्याचे आदेश दिले होते. या ४९ लाखाच्या रकमेपैकी केवळ पावणे दोन लाख रुपयेच रुग्णांना परत मिळाल्याने संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली होती व त्य़ासाठी त्यांनी महापालिकेत आंदोलन केले. या आंदोलनानंतर मनपा आयुक्तांनी संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कार्यवाही करण्याची लेखी ग्वाही दिली.

नगर शहरातील कोरोना पेशंटकडून जादा रक्कम घेतलेल्या हॉस्पिटलने जादा घेतलेली रक्कम परत न केल्याने संबंधित हॉस्पिटलवर इतके दिवस उलटून देखील महापालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून आल्यामुळे हॉस्पिटल चालकांना महापालिकेचे आयुक्त व संबंधित पदाधिकारी पाठीशी घालताना दिसत आहेत, असा आरोप मनसेने केला होता. तसेच, त्यामुळे रुग्णांना वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी व जे हॉस्पिटल वाढीव बिलाची रक्कम परत करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसेच्यावतीने मनपा आयुक्तांच्या दालनात झोपून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनोज राऊत, अ‍ॅड.अनिता दिघे, अशोक दातरंगे, पोपट पाथरे, गणेश शिंदे, तुषार हिरवे, अमोल बोरुडे, रतन गाडळकर, गणेश मराठे, दीपक दांगट, संकेत व्यवहारे, अभिनय गायकवाड, आकाश कोल्हार, आकाश पवार, विनोद काकडे आदी सहभागी झाले होते. यावेळी सचिव भुतारे म्हणाले की, करोना काळातील करोना रुग्णांवरील वाढीव बिलाची रक्कम परत करण्याचे आदेश महापालिकेने शहरातील 13 हॉस्पिटलला दिले होते व वाढीव बिलाची रक्कम रुग्णांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते. पण खासगी हॉस्पिटलनी उपजिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली आहे, असा दावा त्यांनी केला. डफळ म्हणाले, संबंधित हॉस्पिटलकडून संबंधित रुग्णांचे पत्ते सापडत नसल्याचे कारण देण्यात येत असल्याने आता मनपानेच शहरात रिक्षा फिरवून याबाबत आवाहन करावे तसेच स्थानिक वृत्तपत्रांत त्याबाबत जाहीर करावे, अशी मागणी केली. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवाल म्हणाले की, आम्ही वेळोवेळी हॉस्पिटलशी संपर्क ठेवून आहोत, त्यांना याबाबत आधीही नोटीसा पाठविल्या आहेत. आता त्यांना शेवटची नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये जर संबंधित हॉस्पिटलकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, तर संबंधित हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करु, असे आश्‍वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post