..तर, मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाणी सेना तोडणार; मनपाच्या आंदोलनात दिला इशारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर-कल्याण रोड परिसरातील शिवाजीनगरसह सर्व नागरी वसाहतींचा पाणीप्रश्न महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोडवला नाही तर शिवसेनेकडून महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी असलेले नळकनेक्शन तोडण्यात येतील, असा इशारा शिवाजीनगर परिसरातील सेना नगरसेवक शाम नळकांडे यांनी दिला आहे. दरम्यान, शिवाजीनगर परिसराच्या पाणीप्रश्नासाठी सेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेत आंदोलन केले तसेच महासभेतही आवाज उठवला.

नगर-कल्याण रोड परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व किमान दिवसाआड तरी पाणी मिळावे या मागणीसाठी नागरिकांनी या भागातील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकही या आंदोलनात सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजीने आंदोलकांनी महापालिका दणाणून सोडली. कल्याण रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा या भागात पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी व शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना आठ दिवसापूर्वी पत्र देवून या पाणीप्रश्नात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आवाहन केले होते व आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. तरीही महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे नगरसेवक शिंदे व नळकांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत ठिय्या आंदोलन केले गेले. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक अनिल शिंदे, मदन आढाव, संग्राम शेळके, प्रशांत गायकवाड, संतोष गेनाप्पा, संजय शेंडगे, निलेश भाकरे, पारुनाथ ढोकळे यांच्यासह कल्याण रोड परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

पाणी नाही तर घरपट्टी नाही
आंदोलकांच्या हातामध्ये विविध फलक होते. कल्याण रोड परिसराचा पाणीप्रश्न दूर करा, किमान दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे, टँकरचे किंवा नळाचे पाणी नियमित करा, पाणी नाही तर घरपट्टी नाही अशा जोरदार घोषणा आंदोलनात सुरू होत्या. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत या भागातील नागरिक घरपट्टी-पाणीपट्टी भरणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महासभेतही गदारोळ
कल्याण रोडच्या पाणीप्रश्नी महापालिका आवारात आंदोलन झाल्यावर महापालिकेच्या ऑनलाईन महासभेतही गदारोळ झाला. ही सभा सुरू झाल्यानंतर सभागृहातही या पाणीप्रश्नी नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, अनिल बोरुडे, योगीराज गाडे, संग्राम शेळके आदींनी आंदोलन केले. यावेळी कल्याण रोडवरील काही आंदोलक नागरिकही सभागृहात फलक हातात घेऊन घुसले होते. दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल व शिवाजीनगर परिसराच्या पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post