मनपा 'नगररचना' चौकशीच्या रडारवर; राज्यमंत्र्यांनी घेतली तक्रारीची दखल

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर महापालिकेचा नगर रचना विभाग चौकशीच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यासंदर्भात त्यांच्याकडे मनपाच्या काही नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना संबंधित तक्रारींची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस नगरसेवकांनीच नगररचना विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध उठवलेला आवाज व त्याच्या चौकशीचे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीच दिलेले आदेश, यामुळे नगर मनपामध्ये खळबळ उडाली आहे.


मनपाच्या सावेडीतील प्रभाग दोनमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक रुपाली वारे, संध्या पवार, विनीत पाऊलबुध्दे व सुनील त्र्यंबके यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप, निखील वारे उपस्थित होते. या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या विभागाच्या चौकशीची उत्सुकता महापालिकेत आहे.

मनपाच्या नगररचना विभागाची मोठ्या बिल्डरांशी हातमिळवणी आहे. एका जमिनीचे तुकडे करून नियमातून पळवाट काढून अ‍ॅमिनिटी स्पेस न ठेवून मनपाचे नुकसान केले गेले आहे. सीना नदी पूर नियंत्रण रेषा निश्‍चित होऊनही त्या हद्दीत बांधकाम ले-आऊट मंजूर करून बांधकाम परवानग्या दिल्या जात आहेत. त्याचा शहरावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे मनपाच्या नगररचना विभागाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. बांधकाम परवानग्या व ले-आऊट मंजूर करताना सर्व नियम, कायदे पायदळी तुडवून आर्थिक तडजोडीतून परवानग्या दिलेल्या आहेत. ले-आऊट मंजूर करताना नैसर्गिक ओढे-नाले गायब केलेले आहेत. केडगाव सं.नं.28, मराठानगर या जमिनीतील पूर्वीच्या ले-आऊटमधील ओढा गायब करून मोठी आर्थिक तडजोड केलेली आहे. ले-आऊटमध्ये ओपन स्पेस मध्यभागी सहभागी ठेवलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या सर्व ले-आऊटची चौकशी होणे आवश्यक आहे. सर्व प्रकरणांची चौकशी करून कारवाई करावी, असे नगरसेवकांनी तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post