बनावट सोने ठेवले तारण.. नगर जिल्हा बँकेने केला गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सोने तारण कर्ज घेताना तारण स्वरुपात बनावट सोने ठेवून फसवणूक केल्याबद्दल नगर जिल्हा सहकारी बँकेने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अशा १३४ खातेदारांवर अशाच पद्धतीने आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी 21 जणांविरुद्ध 34 लाख 45 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे व त्याला राहुरी न्यायालयाने शनिवार (ता. 26) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गोल्ड व्हॅल्युअर अरविंद नागरे (रा. टाकळीमिया) असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, संदीप अनाप, दिगंबर जाधव, राजेंद्र थोरात, भास्कर अंत्रे, ज्ञानदेव शिंदे, दत्तात्रेय शेळके (सर्वजण रा. सोनगाव), शिवाजी अनाप, प्रेमकिरण डुकरे, संजय बेल्हेकर, अविनाश नालकर, अक्षय गडगे, दत्तात्रेय सिनारे, सचिन निधाने (सर्वजण रा. सात्रळ), गणेश वांदे (कोल्हार बु.), राजेंद्र हारदे (रा. तिळापूर), मुनीफ शेख (रा. पाथरे बु.), संदीप सजन (रा. अनापवाडी), नवनाथ पठारे (रा. रामपूर), शिवाजी संसारे (रा. निंभेरे), दत्तात्रेय वाणी (रा. झरेकाठी) आदींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगितले जाते. यापैकी दहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अडीच कोटीची फसवणूक
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने सत्यता पडताळणीत बनावट आढळले आहेत. 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली. त्यामुळे आता बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोनगावचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या टप्प्यात 20 कर्जदारांसह सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, सोनगाव-सात्रळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post