बेरोजगार इंजिनिअर विद्यार्थी पायी मोर्चाने धडकणार मातोश्रीवर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बेरोजगार इंजिनिअर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पायी मोर्चा आंदोलन हाती घेतले आहे. नगरमधील हुतात्मा करवीर चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास बुधवारी (२ डिसेंबर) सकाळी १० वाजता अभिवादन करून ३० विद्यार्थी लेफ्ट-राईट करीत पायी मोर्चाने मुंबईकडे कूच करणार आहेत. नगरमधून सुरू होत असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातील बेरोजगार अभियंत्यांचेही समर्थन मिळाले असून, प्रत्येक जिल्ह्यातून असे बेरोजगार अभियंते अशाच पद्धतीने पायी मुंबईकडे निघणार आहेत.

सध्याच्या नियोजनानुसार येत्या १५ डिसेंबरला या सर्व पायी मोर्चांनी मुंबईत भेटून एकत्रितपणे मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न सोडवण्याचे साकडे घालण्याचे ठरले आहे. मराठा आरक्षणासाठीचे पायी मोर्चे भाजपच्या सत्ताकाळात राज्यभरात गाजले होते, तशाच पद्धतीने आता बेरोजगार अभियंत्यांचे पायी मोर्चे राज्यात गाजण्याची चिन्हे आहेत.

अभियांत्रिकी शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यावसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली नसल्याने आता मातोश्रीवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. एक डिसेंबरलाच हा मोर्चा निघणार होता, मात्र या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने तो एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मोर्चाचे संयोजक स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पायी मोर्चात येता येणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाल्यावर त्या दिवशी महिला व युवती वाहनाने मुंबईत येणार आहेत.

पहिल्या दिवशी घरचा डबा.. नंतर..
नगरमधील ३० विद्यार्थी मात्र पुण्यामार्गे पायी मुंबईकडे जाणार आहेत. पहिल्या दिवशी नगर-पुणे रस्त्यावरील सुप्यात पहिला मुक्काम करणार आहेत. रोज २५ ते ३० किलोमीटर अंतर चालण्याचे नियोजन आहे. पहिल्या दिवशी घरून जेवणाचा डबा घेऊन जाणार असून त्यानंतर वाटेत गावोगावी थांबून लोकांना आपल्या प्रश्नांची माहिती देत तसेच त्या गावांतील बेरोजगार अभियंत्यांशी संवाद साधून पुढे वाटचाल करणार आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने वाटेत गावकऱ्यांनीच आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या-नव्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना कामांचे कंत्राट मिळण्यासाठी नियम सुलभ करणे, सहा लाखांपर्यंतची कामे विनानिविदा त्यांना उपलब्ध करून देणे, महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीच्यावेळी होणारे गैरप्रकार थांबविणे, त्यासंबंधी आलेल्या तक्रारींनुसार संबंधितांची चौकशी करणे, स्थापत्य आणि वीज अभियंत्यांना कत्रांटदार नोंदणीसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, औषध निर्माण विभागाच्या विद्यार्थ्यांना मेडीकल दुकान सुरू करण्यासाठी सरकारने कर्ज सुविधा योजना सुरू करावी, अभियांत्रिकीचा व्यावसायिक दर्जा रद्द करावा आणि त्याचे खुल्या प्रवर्गासाठीचे प्रवेश पाच पेक्षा जास्त नसावेत, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातील भरतीसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांना कामे मिळवून देताना लाचखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

Post a Comment

Previous Post Next Post