'ते' निगेटीव्ह.. जिल्ह्याचा जीव भांड्यात


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नऊ महिन्यांपूर्वी दुबईहून आलेल्या काही नगरकरांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आणि त्यानंतरच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे सिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर आताही इंग्लंडमधून काहीजण नगरला आल्याने व इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाने हाहाकार उडवला असताना या तेथून आलेल्यांचीही तपासणी करण्यात आल्याने जिल्हा अस्वस्थ होता. ही मंडळी नवा करोना जिल्ह्यात आणतात काय, अशी भीतीही होती. पण सुदैवाने या २५ जणांपैकी २० जणांची चाचणी निगेटीव्ह आली आणि जिल्ह्याचा जीव भांड्यात पडला. मात्र, अजूनही पाच जणांचा चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नव्या कोरोनाची टांगती तलवार जिल्ह्यावर आहेच.

इंग्लंडहून जिल्ह्यात आलेल्या २५ प्रवाशांपैकी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन दिवसांपासून अस्वस्थ असलेले जिल्ह्यातील वातावरण काहीसे निवळले. मात्र, यानिमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावाच, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हावासियांना केले आहे.

सध्या इंग्लंडमधील काही भागात कोरोनाचा नवीन विषाणू आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून परतलेल्या व अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 25 व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनास मिळाली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती 19 व्यक्ती अहमदनगर महापालिका हद्दीतील तर 6 व्यक्ती या ग्रामीण भागात आढळून आल्या आहेत. या 25 व्यक्तींपैकी 20 व्यक्तींची आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत. उर्वरीत 5 व्यक्तींचे आर.टी.पी.सी.आर. तपासणीसाठी नमुने घेण्यात आले असून तपासणी अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post