उशिरा गुन्हे दाखल करताहात? पोलिस अधीक्षकांनी दिली कनिष्ठांना तंबी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वाजवी कारणाशिवाय उशिराने गुन्हे दाखल केले तर बघा, अशा आशयाच्या पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या सूचना वजा तंबीने पोलिस ठाण्यांतून आता गुन्हे दाबण्याचे प्रकार हळूहळू कमी होऊ लागले आहेत. ऑक्टोबरअखेर २४५ गुन्हे उशिराने दाखल झाले होते,पण पोलिस अधीक्षकांच्या सक्त सूचनेचा परिणाम होऊन नोव्हेंबरअखेर ही संख्या अवघी ११२वर आली. दरम्यान, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कोणत्याही नागरिकाला काही अडचण आली तर त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक किंवा जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी पोलिस ठाण्यांतून उशिरा गुन्हे दाखल होत असलेल्या प्रकाराला आळा घालण्याचे सुतोवाच पत्रकारांशी बोलताना केले होते. त्यानुसार त्यांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतून उशिरा दाखल झालेल्या गुन्ह्यांची तसेच त्याच्या कारणांची माहिती त्यांनी तपासली. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब वाजवी आहे की नाही, याचीही तपासणी केली व त्यानंतर आता वाजवी कारणाशिवाय उशिराने गुन्हे दाखल होऊ नये, अशा सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ती जबाबदारी आता त्यांची
अपघाताचे, मालाविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गुन्हे उशिराने दाखल होत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या तपासणीत स्पष्ट झाल्याने आता त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर भर दिला गेला आहे. शरीराविरुद्धचे व अपघाताच्या गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्याची जबाबदारी आता स्टेशन डायरी अंमलदारावर टाकली गेली आहे तसेच मालाविरुद्धच्या गुन्ह्यात अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाऊ नये. आलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा दखलपात्र आहे की नाही, याची संदिग्धता असेल तर ललितकुमारी विरुद्ध शासन या खटल्याच्या न्यायनिवाड्याचा आधार घेऊन तातडीने गुन्हा दाखल केला जावा, अशाही सूचना पोलिस अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post