ग्रामपंचायत निवडणुकीत बांगलादेशी मतदार?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एका वॉर्डातील वा एखाद्या गटा-गणातील आपले समर्थक मतदार दुसऱ्या वॉर्डात वा गटा-गणात दाखवण्याचे प्रकार ऐकिवात होते. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चक्क बांगलादेशातील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रताप प्रशासनाने केल्याचा आरोप आहे. अर्थात हा प्रकार प्रशासनाने स्वतःहून केला की कोणाच्या सांगण्यावरून केला, हा वेगळा विषय असला तरी गावच्या निवडणुकीत बांगलादेशी बजावणार असलेल्या मतदानाच्या हक्काला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. ही नावे वगळली गेली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत मतदार यादीत बांगलादेशी मुस्लिम नागरिकांची नाव नोंदणी झाल्याचा दावा मनसेने केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही बोगस नोंदणी केल्याचाही मनसेचा आरोप आहे. त्यामुळे त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी व संबंधित नावे मतदार यादीतून वगळण्याची त्यांची मागणी आहे. याबाबत मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी माहिती देताना सांगितले की, सुपा ग्रामपंचायत हद्दीतमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे 91 परदेशी व परप्रांतिय नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे मतदार मोकळ्या जागेत झोपडपट्टी बांधुन राहात असून, त्यांचे दर सहा महिन्यांनी स्थलांतर होत असते. त्यांना राजकीय हस्तक्षेपामुळे बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड मिळालेले आहे. त्या आधारावर सुपा-वाळवणे रस्त्यालगत गट नंबर 42 मध्ये कच्या स्वरूपाची पाले-तंबू असा निवारा करुन राहात आहेत. याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांनीसुद्धा पाहणी करून अहवाल सादर केला आहे. ही बोगस नावे असल्याचे निष्पन्न झाले, असा अहवाल पंचायत समिती सभापती यांना दिला होता. तरीसुद्धा ही नावे वगळण्यात आली नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे. 

नवीन मतदार नोंदणीसाठी 15 वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो व तसा पुरावाही या नाव नोंदणीत नाही, हे माहिती अधिकारात सिध्द झाले आहे. तरी कुठल्या आधारावर ही नावनोंदणी झाली याची माहिती घेण्यासाठी अनेक राजकीय-सामाजिक संघटनांनी तहसीलदारांना निवेदने दिली. तरीही ही नावे मतदार यादीतून वगळली नाहीत. तहसीलदार स्थानिक आमदाराच्या दबावाखाली काम करत असून स्थानिक आमदार व सरपंच मुस्लिम मतदान घडवून आणण्यासाठी या बांगलादेशी मुस्लिमांचा वापर करत आहे, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीत यादी भाग नंबर 267 व 268 मध्ये आलेली 91 बोगस नावे रद्द करावी, तसेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या बोगस नावे असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. असे झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या दालनात आंदोलन करेल, असा इशाराही मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, अविनाश पवार, नितीन म्हस्के, उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहकले यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे, असे भुतारे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post