पालकमंत्र्यांना नगर 'माझा जिल्हा' वाटत नाही? दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यास असमर्थ?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बिबट्यांनी नगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे...बड्या राजकीय नेत्यांच्या घरांजवळ बिबटे पोहोचले आहेत...निरपराध बालके व महिलांचे बळी घेतले आहेत..त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पण कॅबिनेट मंत्री असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना स्वतःच्या अधिकारात हा निर्णय घेता येत नाही, त्यासाठी त्यांना उर्जा मंत्र्यांशी चर्चा करावी लागणार आहे व हे नगर जिल्ह्याच्यादृष्टीने दुर्दैव झाले आहे. ''मी पालकमंत्री असलेल्या 'माझ्या नगर' जिल्ह्यातील भयभीत शेतकऱ्यांना दिवसा वीज मी देईल', अशी ठोस ग्वाही ते देऊ शकत नाहीत, यातच त्यांना नगर जिल्हा 'माझा जिल्हा' वाटत नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच आता बिबट्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री मुश्रीफ कधी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करतात व ते दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतात की नाही, याची प्रतीक्षा लागली आहे.

तब्बल सव्वा महिन्याने पालकमंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी नगरला येणे केले व पत्रकार परिषदही घेतली. जिल्ह्यात बिबट्याचा प्रश्न आहे व शेतकऱ्यांकडून दिवसा वीज देण्याची मागणी होत आहे, हे त्यांनीच स्वतःहून पत्रकारांना सांगितले. नगर जिल्ह्यात ५५० बिबटे आहेत व वनाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी पिंजरे लावण्याच्या सक्त सूचना दिल्याचेही स्पष्ट केले. पण हे करताना एक राजकीय मिश्किल टिपणीही त्यांनी केली. ''नगर जिल्हा वाघ-सिंहांचा (राजकीयदृष्ट्या) जिल्हा असल्याचे ऐकून होतो, पण आता येथे बिबटे (याचा राजकीय अर्थ काय?) वाढले आहेत. शिवाय हे बिबटे कळप करून राहात नाहीत तर स्वतंत्र असतात, त्यामुळे त्यांचा त्रास अधिक असल्याने त्यांना पिंजऱ्यात पकडून रेस्क्यू सेंटर परिसरात सोडण्याचे काम केले जात आहे. बिबट्यांना रेडिओकॉलर लावण्याची सूचना असली तरी ते अशक्य आहे, कारण वन विभागाकडे मॅनपॉवर नाही. बिबट्यामुळे पिके, जनावरे व माणसांच्या मृत्यूच्या नुकसानभरपाईची तरतूद आहे'', असे निर्विकारपणे त्यांनी स्पष्ट केले. पण नंतर त्यांनी बिबट्याच्या भीतीने रात्री कोणी शेतात पाणी देण्यासाठी जाण्यास धजावत नसल्याने दिवसा वीज देण्याची मागणी होत आहे. महावितरणचे अधिकारी त्यासाठी असा प्रस्ताव पाठवावा लागेल असे सांगतात, त्यानुसार ते प्रस्ताव पाठवणार आहेत व मीही उर्जा मंत्री यांच्य़ाशी याबाबत बोलणार आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले. पण पालकमंत्री म्हणून मी काम करीत असलेल्या माझ्या जिल्ह्यातील घाबरलेल्या शेतकऱ्यांना बिबट्यापासून संरक्षण मिळण्यासाठी दिवसा वीज मी देईलच, असे ठाम व ठोस आश्वासन त्यांनी दिले नाही. नगरचे पालकमंत्री म्हणून ते असे स्पष्ट आश्वासन देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत होते. पण आता ते ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करणार व नंतर उर्जा मंत्री तसा निर्णय घेणार की नाही, याचाही प्रश्न असणार आहे.

मदतीकडे दुर्लक्षही स्पष्ट

कोरोनामुळे निधन झालेल्या दोन कोरोना योद्ध्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखाचे मदतनिधी त्यांनी दिले. पण जिल्ह्याने अशा मदतीचे ८ प्रस्ताव पाठवले असताना व त्यांना सर्वप्रकारची मंजुरी असतानाही बाकीच्या सहा प्रस्तावांचे पैसे का जिल्ह्याला दिले जात नाहीत, याची शहानिशा त्यांना मुंबईत बसूनही करता येऊ शकत होती. म्हणजे मुंबईत असतानाही नगर जिल्ह्याचे विषय त्यांच्या अजेंड्यावर असतात की नाही, हाही आता चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, नगर शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री वेळ देत नाही, हे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीच भर पत्रकार परिषदेत मोकाट जनावरे, कायदा-सुव्यवस्था व अन्य प्रश्न मांडून स्पष्ट केले आहे. त्यावरही ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले नाही. यातून स्वपक्षाच्या आमदारांनी मांडलेले प्रश्न सोडवण्याला होत असलेली चालढकल, पालक मंत्रांच्या दुर्लक्षामुळे पोलिस-प्रशासन व मनपा अधिकारीही नगरच्या प्रश्नांना मोजत नाही, असे दिसू लागलेले चित्र तसेच आ. जगताप शेजारी बसलेले मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यावर तोफ डागत असताना, पालकमंत्री मायकलवार यांना तेथेच खडसावू शकत होते, पण मनपा स्वायत्त संस्था असल्याचे सांगून त्यांनी हात झटकल्याने हेच नगरकरांना आता खटकत आहे व नगरला आल्यावर केवळ वेळ मारून नेण्याचे काम पालकमंत्र्यांकडून सुरू असल्याची भावना बळावू लागली आहे. बहुदा म्हणूनच ते नगरला बैठकीसाठी येतात तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील मंत्री वा कोणी आमदारही या बैठकांना का फिरकत नाहीत, याचीही कारणे स्पष्ट होत असल्याची भावनाही वाढू लागली आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post