'जय आनंद' देणार कोविड जागृतीवर भर; नवे पदाधिकारी नियुक्त

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दर महिन्याला किमान एकतरी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने आता नव्या वर्षातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात कोविड जनजागृतीवर भर देण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाची सुरुवात कोविडमुळे विविध अडचणींचा सामना करीत असलेल्या जामखेडमधील ग्रामीण विकास केंद्राच्या निवारा बालगृह या संस्थेतील मुलांसाठी किराणा साहित्य भेट देण्यात आले. दरम्यान, जय आनंद महावीर युवक मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यात अध्यक्षपदी नगर अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांची फेरनिवड करण्यात आली तसेच सचिवपदी हेमंत मुथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वर्षभरातील बाराही महिन्यांमधील सण-उत्सव साजरे करताना यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा पायंडा जय आनंद महावीर युवक मंडळाने मागील १०-१५ वर्षांपासून जपला आहे. अनाथ मुलांना तिळगुळ व भेटवस्तू, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर, वैज्ञानिक उपकरणे स्पर्धा, पाककला स्पर्धा, पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पादत्राणांची दुरुस्ती, नवरात्रात देवीभक्तांना फळांचे वाटप, राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराजांच्या स्मृतिनिमित्त अन्नदान अशा अनेकविध छोट्या-मोठ्या उपक्रमांतून जय आनंद महावीर युवक मंडळ कार्यरत असते. यंदा कोरोना व कोविडने सर्व जग व्यापून टाकले असल्याने व प्रत्येकाला कोरोनामुळे जीव गमावण्याची भीती वाढत असल्याने जय आनंद महावीर युवक मंडळाने यंदा नव्या वर्षातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात कोविड-कोरोना जनजागृती अभियान हाती घेतले आहे. नियमित मास्क वापरणे, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळणे वा जाण्याची वेळ आलीच तर तेथे आधी सॅनिटायझेशन करून घेणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच शरीरांतर्गत रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवश्यक व्यायाम व आहार याचे मार्गदर्शनही यानिमित्ताने केले जाणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

जय आनंद महावीर युवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी शैलेश मुनोत यांची फेरनिवड झाली असून सेक्रेटरीपदी हेमंत मुथा यांची निवड झाली आहे. तर अन्य पदाधिकारी असे- उपाध्यक्षपदी शरद मुथा व सचिन कोठारी, सहसेक्रेटरीपदी योगेश मुनोत, खजिनदारपदी अमित गांधी, सहखजिनदारपदी चेतन गुगळे. यावेळी अध्यक्ष मुनोत म्हणाले, मागील वीस वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत. आताच्या करोनाच्या संकट काळात आपण अनेकांना मदत करू शकलो. भविष्यात आपण अशाच एकजुटीने नवनवीन समाजपयोगी काम सुरूच ठेवू. सेक्रेटरी हेमंत मुथा म्हणाले, नवीन वर्षात चांगले उपक्रम राबवून उत्कृष्ट कामांची मंडळाची परंपरा पुढे नेऊ तर मावळते सेक्रेटरी कुंतीलाल राका यांनी काम करण्याची व त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. करोना काळात अतुलनीय योगदानाबद्दल करोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post