विस्मृतीतील 'ते 'प्रकरण पुन्हा आले चर्चेत.. सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अडीच वर्षांपूर्वी नगरच नव्हे तर राज्यभर गाजलेल्या केडगावच्या संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. नगरकरांच्या व माध्यमांच्या जवळपास विस्मृतीत गेलेल्या या प्रकरणातील आरोपी व नगर मनपाच्या काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने व त्यांचा अंतरिम अटकपूर्व रद्द केल्याने केडगावचे दुहेरी हत्याकांड पुन्हा चर्चेत आले. आता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिस त्यांना अटक करतात की, त्या उच्च न्यायालयात आव्हान देतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

६ एप्रिल २०१८ रोजी केडगाव उपनगरातील एका प्रभागाची पोट निवडणूक झाली व तिची मतमोजणी आणि निकाल ७ एप्रिल २०१८ रोजी जाहीर झाला. काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या निकालाच्या दिवशी सायंकाळी वसंत ठुबे व संजय कोतकर या दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आले होते. या हत्याकांडाचा कट सुवर्णा कोतकर यांनी रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोतवाली पोलिस ठाण्याकडे होता. नंतर तो स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे हा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.

या गुन्ह्यात शहर कॉंग्रेसचा बडतर्फ शहराध्यक्ष भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, त्याची पत्नी सुवर्णा कोतकर, औदुंबर कोतकर यांच्यासह 12 आरोपी आहेत. सुवर्णा व औदुंबर कोतकर हे गेल्या अडीच वर्षापासून फरार असून, उर्वरित 10 आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे प्रकरण आले चर्चेत

सुवर्णा कोतकर सापडत नसल्याने सीआयडीने त्यांच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट न्यायालयाकडून १० नोव्हेंबरला घेतले होते, पण त्यानंतर लगेच १३ नोव्हेंबरला अॅड. नितीन गवारे यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देऊन सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. कोतकरांकडून अॅड. गवारे यांनी बाजू मांडली. सुवर्णा कोतकर फरार झालेल्या नाहीत, त्या येथेच आहेत तसेच केडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या बैठकांनाही हजर होत्या, असा दावा करीत या बैठकांचे हजेरीपत्रक त्यांनी न्यायालयात सादर केले. त्यानंतर सरकारी वकील अॅड. केदार केसकर यांनी यात सरकार पक्षाचे म्हणणे मांडले. सुवर्णा कोतकर अडीच वर्षापासून गायब आहेत, त्यामुळे त्यांना पोलिस कस्टडीत घेऊन या प्रकरणाचा तपास करणे गरजेचे आहे. खुनाचा कट कसा रचला, संदीप कोतकरला फोन का दिला गेला, त्याच्याशी काय बोलणे झाले, भांडणे मिटवायला गेलेल्याकडे हत्यारे कशी होती, अशा सगळ्या विषयांतून कट करून खून केल्याचे दिसत असल्याने याबाबत पोलिस तपास गरजेचा आहे, त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी विनंती अॅड. केसकर यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अमित शेटे यांनी कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, अडीच वर्षांपूर्वी सायंकाळी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानंतर लगेच काही वेळातच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय फोडण्याचा प्रकार घडला होता. या खून व पोलिस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणानंतर राज्यभर नगरचे नाव पोहोचले होते. या घटनानंतर महापालिकेची, लोकसभेची व पुढे विधानसभेचीही निवडणूक झाली. त्यातही हे मुद्दे चर्चेत आले. पण या निवडणुका झाल्यावर आता ही दोन्ही प्रकरणे नगरकरांच्या जवळपास विस्मृतीत गेली आहेत. कोतकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या विषयाने यातील खून प्रकरण मात्र पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे व वैद्यकीय जामीन मिळाला आहे. पण नगर जिल्ह्यात येण्यास हायकोर्टाने व जिल्हा न्यायालयाने बंदी घातली आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडातही तो आरोपी आहे. पण जिल्हा बंदीमुळे तो नगरला येऊ शकत नाही तसेच सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर फरार असल्याने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येत नाही. परिणामी, अजून केडगावचे दुहेरी हत्याकांड प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होऊ शकलेली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post