आ. जगतापांनी केले मंत्री मुश्रीफांना निरुत्तर; नगरच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची जाहीर मांडली व्यथा

एसपी व मनपा आयुक्तांच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''अहो साहेब...जरा थांबा,...मला बोलू द्या....नगरमध्ये सुपारी देऊन महिलेचा खून होतो....केडगावमध्ये दिवसाढवळ्या घरे फोडण्याचे प्रकार होतात व पोलिस म्हणतात तक्रार देऊ नका...नगर शहरातील प्रत्येक रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते...कोठल्यासारख्या महामार्गावरील व गर्दीच्या चौकात अवजड वाहने पार्क केली जातात...पोलिस करतात काय?....हे कमी म्हणून की काय, मनपा आयुक्तांना चार महिन्यांपासून सांगतोय रस्त्यावरील मोकाट जनावरांचा नागरिकांना खूप त्रास होतोय, त्यांना पकडा. पण या माणसाने चार महिन्यात एकतरी मोकाट जनावर पकडले काय, हे सांगावे...''....नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भर पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सरबत्ती सुरू केली आणि मुश्रीफ निरुत्तर झाले.

''आपण नंतर बोलू, मिटींग घेऊ''...म्हणत मुश्रीफांनी जगतापांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित पत्रकारांनी ''नगरचे प्रश्न नगरचा लोकप्रतिनिधी मांडत असल्याने जगतापांना बोलू द्यावे,'' अशी भूमिका घेतली. परिणामी, मुश्रीफांचाही नाईलाज झाला. पण जगतापांनी तळतळीने मांडलेल्या या प्रश्नांकडे मात्र नंतर त्यांनी स्पष्टपणे दुर्लक्षच केले. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे त्यांनी सूचित केले व मनपा ही स्वायत्त संस्था असल्याचे सांगून या संस्थेशी संबंधित प्रश्न सोडवण्याला चक्क बगल दिली. दरम्यान, आपल्याच राष्ट्रवादी पक्षाच्या जबाबदार लोकप्रतिनिधीने नगर शहराबाबत आता व याआधीही मांडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे राष्ट्रवादीचेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री मुश्रीफ गुरुवारी नगरला आले होते. कोरोनामुळे मरण पावलेल्या करोनायोद्ध्यांच्या वारसांना नुकसान भरपाईचे धनादेश देण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा संवाद संपण्याच्या बेतात असताना व पत्रकारांच्या प्रश्नांना मुश्रीफांकडून उत्तरे देऊन झाल्यावर पत्रकार परिषद आटोपती घेण्याची त्यांची तयारी सुरू असतानाच शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या संवादात हस्तक्षेप केला व मला बोलू द्या असे म्हणून नगर शहराचे ज्वलंत प्रश्न त्यांनी मांडले. पत्रकार व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्षच आपल्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडून जाहीरपणे आपल्या नगर शहराकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे निघत असलेले वाभाडे पाहून मुश्रीफ काहीकाळ स्तब्ध झाले व त्यांनी जगतापांना नंतर बोलू म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर पत्रकारांनीही जेव्हा जगतापांना बोलू देण्यास सांगितल्याने मुश्रीफ निरुत्तर झाले. त्यामुळे त्यांना जगतापांनी मांडलेल्या नगर शहरवासियांच्या वेदना व व्यथा ऐकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण त्या ऐकल्यावरही त्यांनी ठोसपणे काहीही भाष्य केले नाही. मात्र, नंतर शासकीय विश्रामगृहावर जगतापांना बोलावून घेऊन तेथे त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांचा सुपारी देऊन झालेला खून तसेच केडगाव भागात सायंकाळच्यावेळी घरात माणसे असतानाही २०-२५जणांच्या टोळक्यांकडून घरे फोडण्याचे होत असलेले प्रयत्न, या प्रयत्नांच्या तक्रारी दाखल करू नका म्हणून पोलिसांकडूनच सांगितले जाणे, शहरातील ट्रॅफिकचे प्रश्न, महामार्गावरील कोठला बसथांब्याजवळ बेकायदेशीर रित्या ट्रकसह अन्य अवजड वाहनांचे होत असलेले पार्किंग, रस्त्यात बसणारी मोकाट जनावरे व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, अशा नगर शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांना आ. जगतापांनी वाचा फोडली तसेच जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून अनेक नागरिक नगरला येतात तसेच शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही नगरमध्ये राहात असताना या शहराचे प्रश्न सुटत नसल्याची जगतापांनी व्यक्त केलेली खंत पालकमंत्री मुश्रीफ गंभीरपणे घेतात की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post