नव्या वर्षात नगरला मिळणार नवा आमदार? कर्डीलेंची चर्चा आतापासूनच सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नवीन २०२१ वर्षांत विधान परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यात नगर स्थानिक स्वराज्य मतदार संघाचाही समावेश असल्याने नव्या वर्षात नगर शहर व जिल्ह्याला नवा आमदार मिळणार आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विद्यमान आमदार अरुणकाका जगताप यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा संधी मिळते की, त्यांचे व्याही व राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? उतरले तर ते कोणत्या पक्षाकडून, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे राजकारण रंगात असल्याने त्याचा नगरच्या या निवडणुकीवर परिणाम होणार की नेहमीप्रमाणे 'सोधा' पक्ष आपसात ठरवून निवडणूक काढणार, याचे कुतूहल व्यक्त होत आहे.

पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आठ मतदारसंघांत निवडणूक होणार असून, नगरसेवक मंडळी या निवडणुकीत मतदार असल्याने नगरसेवकांना साहजिकच भाव येणार आहे. मुंबई महापालिकेतून निवडून आलेले रामदास कदम (शिवसेना) व भाई जगताप (काँग्रेस), नागपूरचे गिरीश व्यास (भाजप), सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक (अपक्ष-भाजप पुरस्कृत), कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गृहराज्यमंत्री बंटी पाटील (काँग्रेस), धुळे-नंदूरबारमधून अलीकडेच पोटनिवडणुकीत निवडून आलेले अमरिश पटेल (भाजप), अकोला-बुलढाणा-वाशीमचे गोपीकिसन बजोरिया (शिवसेना) व नगरचे अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) हे आठ आमदार पुढील वर्षी निवृत्त होत आहेत. या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे मतदार असतात. राज्यातील बहुतांश नगरपालिकांची मुदत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला नगरपालिकांची निवडणूक होईल. नगरपालिकांची निवडणूक झाल्यावर लगेचच विधान परिषदेची निवडणूक होईल, असे सांगितले जाते. यामुळे चुरशीची लढत होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदारसंघातील मतदारांना महत्त्व येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 'खर्चिक' उमेदवाराला यश मिळते, असा अनुभव आहे. पक्षाच्या निष्ठेपेक्षा जास्त 'पाकीट' कोणाचे जड यावर मतदान होते, असे आवर्जून सांगितले जाते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत झालेला 'खर्च' भरून काढण्याची संधी या निवडणुकीनिमित्ताने उपलब्ध होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगरमध्ये रंगणार संघर्ष
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील नगरचे विद्यमान आमदार अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले होते. काँग्रेसचे श्रीरामपूरचे दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे व त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेले राजेंद्र पिपाडा यांचा पराभव त्यांनी केला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या निवडणुकीत आ. जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार होते व त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. शशिकांत गाडे यांचा पराभव केला होता. आता राज्याच्या राजकारणात बदल झाला असून, शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आहेत. त्यांच्याविरोधात भाजप असणार आहे. भाजपकडून कर्डिले उमेदवार होऊ शकतात. पण येत्या वर्षभराच्या राजकारणात काय घडेल, हे सांगता येत नसल्याने निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता आहे. सध्या तरी कर्डिलेंचे नाव या आमदारकीसाठी चर्चेत आहे. नगरमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये लढत होण्याची चिन्हे आहेत. विखे-पाटील यांची भूमिका यात महत्त्वाची असेल, असेही सांगितले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post