आरक्षणासाठी आता मुस्लिम समाज आक्रमक; राज्यभर विविध आंदोलने


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आरक्षणासाठी मुस्लिम समाजही आता आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी ११ डिसेंबर रोजी राज्यभर मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन केले जाणार आहे. मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे.11 रोजी राज्यात धरणे आंदोलन करून निवेदने देण्यात येणार आहेत. तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या आंदोलनांची व्याप्ती राहील, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.

11 डिसेंबरला महाराष्ट्रात एकाच दिवशी संविधानिक मार्गाने धरणे, उपोषण, ढोल बजाओ, घंटानाद, बोंब मारो इत्यादी व अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जाणार आहेत. तसेच 14 व 15 डिसेंबर 2020 ला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 10% मुस्लिम आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळावे, या मागणीसह शिक्षण, संरक्षण यासाठी योग्य आणि समाज हितकारक निर्णय घेण्यात यावे यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत बुधवारी नगरला माहिती देण्यात आली. 

राज्याचे मुख्य समन्वयक रियाज शेख यांनी सय्यद वहाब व प्रमुखांच्या उपस्थितीत आंदोलनाची भूमिका विषद केली व आंदोलनाच्या मागण्याही मांडल्या. मुस्लिम समाजाचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने मुस्लिम आरक्षण संरक्षण, शिक्षण यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. कित्येक दशकांपासून चालू असलेल्या मुस्लिम आरक्षण, शिक्षण, संरक्षणच्या संवैधानिक लढ्याला न्याय मिळावा, समाजाची झालेली अतिमागास परिस्थिती दूर करणेकामी आरक्षण हवेच, महाराष्ट्र सरकारकडून समाजाच्या उच्च अपेक्षा असून या हिवाळी अधिवेशनात याबाबत ठराव करण्यात यावा, समाजाचा सर्वांगीण विकास आरक्षणद्वारेच शक्य असल्याने समाजातील सर्व घटकांनी यात सहभागी व्हावे, हे समाजाने समाजासाठी चालविलेले जनआंदोलन आहे, यास युवकांचा मोठा प्रतिसाद आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन सहभागी होण्यासाठी संपर्क : 9834442499.

Post a Comment

Previous Post Next Post