पवारांचा वाढदिवस रुग्णांना देणार दिलासा; जिल्ह्यात रक्तदान सप्ताहांचे नियोजन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादीने जिल्हाभरात १३ ते २० डिसेंबरदरम्यान आठवडाभर रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. यातून संकलित होणाऱ्या रक्तपिशव्या विविध रक्तपेढ्यांना दिल्या जाणार असून, त्यांचा फायदा विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आजारातून बरे होण्यासाठी होणार आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या रक्तदान सप्ताहांसह विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे.

शरद पवार यांचा १२ डिसेंबरला ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादीद्वारे ३६ जिल्हे व ३५० तालुक्यांतून व्हर्चुअल रॅली या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईतून स्वतः पवार हे राज्यभरातील समर्थक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कोरोना कारणामुळे गर्दी करण्यावर निर्बंध असल्याने कोणीही त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष फाळके यांनी केले आहे. १२ रोजी मुंबईत होणाऱ्या प्रमुख पक्षीय कार्यक्रमाचे प्रसारण राज्यभरात केले जाणार आहे. काही ठिकाणाहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष पवारांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार असल्याचे फाळके यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते पवारांचा वाढदिवस हा राष्ट्रवादी समर्थकांसाठी मोठा सण अशा स्वरुपाचा असल्याने जिल्ह्यातील पक्षाचे आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी व समर्थक आपापल्या मतदार संघात थांबून व्हर्चुअल रॅलीत सहभागी होणार आहेत व १३ ते २० डिसेंबरदरम्यान रोज रक्तदान शिबिरे आयोजित करून जास्तीतजास्त रक्तपिशव्यांचे संकलन करणार आहेत. 

राज्यभर सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान सप्ताह उपक्रमात जास्तीतजास्त रक्तपिशव्या संकलित करून रक्तपेढ्यांद्वारे रुग्णांना उपलब्ध करवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नगर तालुक्यातील पदाधिकारी व नेत्यांसाठी राष्ट्रवादी भवनात व्हर्चुअल रॅली प्रसारण होणार आहे. यावेळी शरद पवारांच्या जीवनावर आयोजित शॉर्ट फिल्म स्पर्धेतील उत्कृष्ट शॉर्ट फिल्म यात दाखवल्या जाणार आहेत तसेच अभिप्राय अभियान विजेत्यांचा सन्मान आणि राष्ट्रवादीच्या वेबसाईटचे उदघाटन, रोजगार योजना व आदिवासी तालुक्यांना आरोग्य कीट वाटप उपक्रमांची सुरुवातही या दिवशी मुंबईत होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. १२ रोजी राष्ट्रीय छात्रसेनेचे १५० जवान कर्जत ते काटेवाडी (बारामती) रॅली काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, राष्ट्रवादी लिगल सेलचे अॅड. सुरेश शिंदे व कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post