ताब्यात घेतले 'याच्यात', वर्ग केले 'त्याच्यात'


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्यासंबंधी चौकशीसाठी पोलिसांनी शुक्रवारी डॉ. नीलेश शेळके याला ताब्यात घेतले होते व ती चौकशी झाल्यानंतर डॉ. शेळकेविरुद्ध दाखल आर्थिक गुन्ह्यात त्याला वर्ग केले. दरम्यान, न्यायालयाने त्या गुन्ह्यात त्याला येत्या ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रेखा जरे हत्याकांडातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या शोधासाठी पुण्यात गेलेल्या पोलिस पथकाला डॉ. नीलेश शेळके सापडला. पोलिसांनी त्याला जरे हत्याकांडाशी संबंधित गुन्ह्यात ताब्यात घेऊन शुक्रवारी रात्री त्याची कसून चौकशी केली व त्याचा जबाबही घेतला. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या आर्थिक गुन्ह्यात तो आरोपी असल्याने त्याला त्या गुन्ह्यात वर्ग केले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या हवाली करण्यात आल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

दोन वर्षांपूर्वी दाखल तक्रार
नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये डॉक्टर रोहिणी सिनारे यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. डॉक्टर शेळके याने वैद्यकीय मशिनरी खरेदी करण्यासाठी बँकेकडून माझ्या नावाने कर्ज घेतले होते. मात्र, मशिनरी खरेदी न करता माझ्या अकाउंटमधून त्यांनी परस्पर पैसे काढून अपहार केला व फसवणूक केली, असा गुन्हा कोतवालीमध्ये दाखल झाला आहे. हा गुन्हा नंतर स्थानिक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला होता. यामध्ये फिर्यादी सिनारे यांनी माझ्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून डॉक्टर निलेश शेळके याने परस्पर ५ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतले, बनावट सह्या व कागदपत्राचा आधार घेत हा व्यवहार त्याने केला असल्याचे म्हटले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा २०१८ मध्ये दाखल झालेला आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण २५ आरोपी असून यामध्ये नगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचासुद्धा समावेश आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेतील आरोपी डॉ. निलेश शेळकेने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर झाल्यावर पोलिसांनी त्याला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. तेथे शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला. शेळके हा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथेही 20 जानेवारी 2020 रोजी अर्ज फेटाळला गेला आहे. त्या दिवसापासून शेळके हा पसार होता. शुक्रवारी पथकाने पुणे येथून शेळके याला ताब्यात घेऊन रात्री त्याला अटक केली. त्याला न्यायालयामध्ये हजर केले होते. न्यायालयामध्ये सरकार पक्षाद्वारे युक्तिवाद करताना, आर्थिक फसवणुकीची घटना गंभीर स्वरूपाची आहे, या संदर्भातल्या तीन वेगवेगळ्या घटना आहेत. फसवणुकीचे तीन गुन्हे असून एकूण ही रक्कम १७ कोटी रुपयांच्या घरांमध्ये आहे. मात्र, डॉ. सिनारे यांच्या प्रकरणांमध्ये ही रक्कम ५ कोटी ७५ लाख रुपये आहे. या घटनेतील हा मुख्य आरोपी असून त्याने हे पैसे कशा पद्धतीने काढले, हे पैसे कुठे वापरले गेले, यासह विविध प्रकारचा तपास पोलिसांना करायचा असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी, असा सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तर आरोपी डॉ. शेळके यांच्यावतीने अॅड. संजय दुशिंग यांनी युक्तिवाद केला. बनावट खाते केल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी असे बोगस अकांउंट बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कसे होऊ दिले, बँकेच्या संचालक मंडळांतील वाद या गुन्ह्यामागे आहेत, विड्रॉल स्लीपवरील सह्यांचे हस्ताक्षर डॉ. शेळकेंचे नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत डॉ. शेळकेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

1 Comments

  1. Evolution Gaming - New Slots Provider
    With the launch of their mobile casino Evoplay slot games, we've 007벳 카지노사이트 been able to offer a new experience for players while providing a place to play  Rating: 4.7 · 소울 카지노 ‎Review by soulil.com

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post