'पत्रकारितेलाही प्रेमाचा गंध आहे'.. जरे हत्याकांड उमटले कवितेत..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''हल्ली पत्रकारितेलाही प्रेमाचा 'गंध' आहे...स्वार्थापुढे नैतिकताही जराशी 'अंध' आहे...'सकाळ'पासून कुठे आहेस, तू 'बाळ'... झाले प्रकरण 'सा-जरे', तूच तुझा 'काळ'...''... कवीकडून एक-एक वाक्य उच्चारले जात होते व नगर जिल्ह्यात गाजत असलेल्या रेखा जरे हत्याकांडाच्या संदर्भातील या काव्य रचनेला टाळ्यांची व हास्यकल्लोळाची दाद मिळत गेली. ठिकाण होते, नगर जिल्ह्यातील पाथर्डी व निमित्त होते, तालुका साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाचे. चितळीचे कवी-पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी पत्रकारितेचा संदर्भ हत्याकांडाशी जोडून सादर केलेली ही कविता रसिकांना खळखळून हसवणारी व टाळ्यांचा कडकडाट मिळवणारी ठरली.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्या, पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेले ५ आरोपी व या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेला व पसार झालेला पत्रकार बाळ ज. बोठे यांचा विषय सध्या माध्यम जगतामध्ये चर्चेत असला तरी या चर्चेला आणखी फोडणी साहित्यिकांकडून मिळू लागली आहे. रेखा जरे व बाळ बोठे यांच्यासंदर्भात सूचक शब्दांची मांडणी करणारी कविता नुकत्याच पाथर्डीला झालेल्या तालुकास्तरीय साहित्य संमेलनात सादर झाली आणि उपस्थित रसिकांनी हास्यकल्लोळात व टाळ्यांच्या गजरात तिला दाद दिली. ''हल्ली पत्रकारितेलाही प्रेमाचा गंध आहे... स्वार्थापुढे नैतिकताही जराशी अंध आहे... हा तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे... पत्रकारितेत त्यांचा तसा हात-खंडा आहे... ह्या लेखणीचा तसा तो जुनाच दोरी-गंडा आहे... जुन्या छत्रीला रोज नवा दांडा आहे... लोकशाहीच्या पदरातला हा धोंडा आहे... पोलिसही बेजार, लेखणीही लाचार आहे... रामायणातल्या वाल्याचा हा विचार आहे... सकाळपासून कुठे आहेस, तू बाळ....झाले प्रकरण सा-जरे, तूच तुझा काळ...''...अशी ही कविता रसिकांची दिलखुलास दाद मिळवून गेली.

पाथर्डीच्या श्री तिलोक जैन विद्यालयाच्या सभागृहात कृष्णा भोजनालय साहित्य मित्रमंडळाचे तालुका साहित्य संमेलन नुकतेच झाले. रविवारी (२० डिसेंबर) सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन व पुरस्कार वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक दौंड,तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष-पत्रकार अविनाश मंत्री, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड, कवी नागेश शेला, स्वागताध्यक्ष हुमायुन आतार उपस्थित होते. निमंत्रितांच्या काव्य संमेलनात कविवर्य व पत्रकार बाबासाहेब गर्जे, कवि व पत्रकार बाळासाहेब कोठुळे,चंद्रकांत उदागे, संतोष दौंडे,ज्योती आधाट, वसंत होळकर,लक्ष्मण खेडकर कारभारी चेन्ने आदीसह स्थानिक पातळीवरील कवींनी काव्यवाचन अभिनयासह आणि तालासुरात सादर केले. प्रेम-कविता, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी, निसर्ग, समता, राजकारण, पर्यावरण अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना खिळवून ठेवले. कवी बाबासाहेब गर्जे हे नुकतेच कोरोनावर मात करून रोगमुक्त झाले आहेत. कोरोनाच्या सुमारे पंधरा दिवसांच्या कालावधीत आलेले अनुभव आणि या काळातील मानसिक व कौटुंबिक स्थिती याचे हृदयस्पर्शी व वास्तववादी त्यांनी केलेले सादरीकरण संमेलनाचा नूर पालटवणारे ठरले. कोवीडची हजेरी,यमाचेच रुप... अंत नको पाहू देवा,झाला शीण खूप... मास्क सॅनिटायझर वापरून लॉकडाऊन भोगिले... टाळ्या-थाळ्या अन दिव्यांनी केली तुझी सेवा... पाणी पिऊन ढेकर गिळला ऐकून मन की बात...उपाशी कोंडीली जनता,वैरी झाली रात... अंत नको पाहू देवा,शीण झाला खूप...या तालासुरात सादर झालेल्या कवितेवर रसिकांचा टाळ्यांचा पाऊस पडला. साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ.दीपक देशमुख,शिरीष जोशी, डॉ. भाऊसाहेब लांडे,आरिफ बेग,निसर्ग छाया चित्रकार राजेश काळे उपस्थित होते. प्रास्ताविक हुमयून आतार,सूत्रसंचालन महादेव कौसे तर आभार शाहीर भारत गाडेकर यांनी मानले. जैन विद्यालयाच्यावतीने प्राचार्य दौंड यांनी मुख्य संयोजक अशोक व्यवहारे यांचा गौरव केला.

Post a Comment

Previous Post Next Post