नगरच्या बालरोग तज्ज्ञाचा देशात सन्मान; डॉ. तांबोळींना पुरस्कार


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज

जन्मानंतर बालकांचा होणारा विकास तसेच वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन समस्यांसह बालकांशी संबंधित आजार व अन्य अनुषंगिक बाबींवर संशोधन करून देशभरातील बालरोग तज्ज्ञांमध्ये त्याची जागृती करणारे नगरचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांना फेलोशीप ऑफ इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रीक्स (एफआयएपी) हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. 

भारतीय बालरोग संघटनेद्वारे दिला जाणारा हा सन्मान शैक्षणिक विद्यापीठाच्या डी.लिट पदवीच्या समकक्ष असल्याचे सांगितले जाते. ही पदवी मिळविणारे नगर जिल्ह्यातील ते पहिले बालरोगतज्ञ आहेत. ही पदवी डॉ. तांबोळी यांच्या २९ वर्षाच्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन देण्यात आली आहे.

डॉ. तांबोळी यांचे नगरच्या महाजनगल्लीत चिरंजीव बालविकास केंद्र आहे. बालकांच्या आजारांवरील उपचारांसह बालकांचे आजार, विकासात्मक वाढ, वर्तन समस्या व अन्य अनुषंगिक बाबींवर येथे नियमित संशोधन चालते. १९९२पासून डॉ. सुचित तांबोळी या संशोधन कार्यात आहेत. मुला-मुलींच्या शारीरिक व मानसिक वाढीचे प्रश्न, त्यांचा बौद्धीक विकास, वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन समस्या, गतिमान व मंदगती मुलांच्या समस्या अशा अनेकविध विषयांचे शारीरिक व मानसिक संशोधन त्यांनी केले आहे व देशभरातील बालरोग तज्ज्ञांना त्याबाबत माहिती व प्रशिक्षणही दिले आहे. हे कार्य तसेच निरंतर संशोधन, बालरोग तज्ज्ञांमध्ये जागृती व समाजकार्य याची दखल घेऊन भारतीय बालरोग संघटनेने त्यांना एफआयएपी सन्मान दिला आहे. 

देशात ३० हजारावर बालरोग तज्ज्ञ असून, दरवर्षी १०-१२ बालरोग तज्ज्ञांना त्यांच्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान दिला जातो. यंदाच्या या सन्मानात नगरच्या डॉ. तांबोळींसह तीन बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉ. तांबोळी यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बालरोग परिषदांतून ८०० वर भाषणे बालकांसंबंधित विविध विषयांवर दिली आहेत. बालरोग संघटनेद्वारे त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांचे वैद्यकीय विश्वातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post