पसार 'बाळ बोठे'ची माहिती द्या.. पोलिसांचे नागरिकांना आवाहन; घर व कार्यालयाची घेतली झडती


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडाची सुपारी देणारा पत्रकार बाळ ज. बोठे याच्या ठावठिकाण्याविषयी कोणाला काही माहिती असेल तर ती त्यांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. पसार बाळ बोठे विषयी अशी माहिती देणाराचे नाव गुप्त राखले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान, बोठेच्या शोधासाठी नियुक्त केलेल्या पाच पथकांपैकी दोन पथकांनी शनिवारी दोन ठिकाणी त्याचा शोध घेतला. पण हा शोध अपयशी ठरला तर दुसरीकडे पोलिसांनी त्याच्या घर व कार्यालयाची झडती घेतली आहे. त्यात काही तांत्रिक व महत्त्वाच्या बाबी पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जाते.


रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पाचजणांना पकडले आहे. या पाचजणांकडे तपास केल्यावर पत्रकार बोठेने जरे यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, खुनाचे कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यासाठी या खुनाची सुपारी देणारा बाळ बोठे पोलिसांना हवा आहे. पण तो गायब झाला आहे. पोलिसांनी कसून शोध घेऊनही तो सापडत नाही. या दरम्यान त्याने नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे चक्रावून गेलेल्या पोलिसांनी अखेर न्यायालयात बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीच्यावेळी त्याला (बोठे) हजर राहण्याचे आदेश व्हावेत, असा अर्ज केला आहे व दुसरीकडे बोठेविषयी काही माहिती असल्यास तसेच त्याच्या ठावठिकाण्याबाबत काही माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचेही आवाहन केले आहे. बोठेविषयी अशी माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्याची ग्वाहीही पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांसाठी केलेल्या या आवाहनास प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होत आहे. तसेच पोलिसांनी न्यायालयात त्याला अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीच्यावेळी हजर ठेवण्याविषयी केलेल्या अर्जाबाबत बोठेची बाजू मांडणारे अॅड. महेश तवले व अॅड. संजय दुशिंग काय भूमिका मांडतात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. 


दरम्यान, पोलिसांनी त्याच्या घर व कार्यालयाची झडती घेतली असून, दुसरीकडे त्याचा शोधही जारी ठेवला आहे. त्याच्याविषयीच्या मिळालेल्या प्रत्येक माहितीची खातरजमा केली जात आहे. बाळ बोठेचा शोध हा जिल्हा पोलिसांसाठी आव्हानात्मक झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post