खासगी डॉक्टर जाणार शुक्रवारी संपावर; आयुर्वेदला दिलेल्या 'त्या' परवानगीचा करणार निषेध


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आयुर्वेद शिक्षण घेतलेल्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध खासगी डॉक्टरांनी केला असून, ही परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शुक्रवारी (११ डिसेंबर) संप पुकारला आहे.

राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुद्ध आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केले आहे. आयएमए संघटनेच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे जमून मंगळवारी या विरोधात निषेध व्यक्त केला. या अधिसूचनेमध्ये बी.एम.एस.झालेल्या आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना 58 अ‍ॅलोपॅथीक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या विरोधातच 11 डिसेंबर रोजी आय.एम.ए.ने देशव्यापी संप पुकारला आहे. या परवानगीच्या निषेधार्थ मंगळवारी झालेल्या आंदोलनात आयएमएच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे, सचिव सचिन वहाडणे यांच्यासह डॉ.बाळासाहेब देवकर, डॉ.प्रताप पटारे, डॉ.महेश वीर, डॉ.रामदास बांगर, डॉ.निसार सय्यद, डॉ.सुप्रिया वीर, डॉ.भोसले, डॉ.दिलीप फाळके, डॉ. दीपाली फाळके, डॉ. दिपाली पठारे, डॉ.अशोक नरवडे, डॉ.सुजाता नरवडे,डॉ. निसार शेख,डॉ. पांडुरंग डौले, डॉ. सुभाष तुवर, डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. दिलीप बगल, डॉ. संतोष चेडे, डॉ. अमित करडे, डॉ. गणेश बंड, डॉ. रेश्मा चेडे, डॉ. संदीप व डॉ. हेमा सुराणा, डॉ. सोनाली वहाडणे, डॉ. अर्जुन शिरसाठ आदी सहभागी झाले होते.

शुक्रवारी सर्व राहणार बंद

इंडियन मेडिकल असोसिएशानने आंदोलनाचे नियोजन केले असून,11 डिसेंबरला भारतातील सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या संपाचे आयोजन केले गेले आहे. या आधिसूचनेचे दुष्परिणाम संबंधित रुग्णांच्या आयुष्यावर व पर्यायाने आरोग्यावर होणार आहे. यासाठी जनजागृतीपर आयएमएच्या सर्व शाखांच्यावतीने देशभरात करण्यात येत आहे. शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनामध्ये शासकीय व खासगी महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. तसेच आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्व स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिटी शाखा, शासकीय डॉक्टरांच्या संघटना, मेडिकल कॉलेजमधील शिक्षक संघटना यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

एवढी परवानगी तर आम्हालाही नाही..

मंगळवारी झालेल्या आंदोलनाच्यावेळी आयएमएच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ.आठरे म्हणाले, सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय, शस्त्रक्रियेचे नामांतर संस्कृत शद्बात करून या सर्व मूळ आयुर्वेद शस्त्रक्रिया असल्याचा खोटा दावा केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद पदव्युतर विद्यार्थी आधुनिक वैद्यकाच्या विविध विशेष शाखांमधील शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरणार आहे. थोडक्यात एकच आयुर्वेद वैद्य अ‍ॅपेंडिक्सचे, किडनी स्टोनचे, कानाचे व डोळ्यांच्या मोतीबिंदूचे देखील ऑपरेशन करेल, त्यालाच पित्ताशयातील खडा काढण्याची अवघड शस्त्रक्रिया करण्याची परवानगी असेल, तोच डॉक्टर दातांची शस्त्रक्रिया करण्यासही पात्र ठरेल, पण ही बाब अतिशय धोकादायक असून आधुनिक वैद्यक शास्त्रातील ज्येष्ठ आणि कुशल शल्यचिकित्सांनादेखील शस्त्रक्रियेतील एवढ्या विस्तृत निवडीची कायदेशीर परवानगी नाही. या आयुर्वेद वैद्यांना एम.एस. ही पदवी लागू होणार आहे, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होणार आहे, असा दावाही डॉ. आठरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, शस्त्रक्रिया नाजूक प्रक्रिया आहे. जी जीवन आणि मरण यातील सूक्ष्म रेषा असते. आधुनिक वैद्यकीय सर्जन सर्व आजारांचा सूक्ष्म अभ्यास करीत असतात मग त्या अभ्यासानंतर तो शस्त्रक्रिया करीत असतो. आयुर्वेदातील अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचिन शाखेचा विकास खुंटवेल आणि भविष्यात आयुर्वेदाचे शास्त्रही नाहीसे होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी रसमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या रद्द कराव्यात, अशी आयएमएची प्रमुख मागणी आहे, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post