दिल्लीचे शेतकरी आंदोलन म्हणजे नवीन शाहीनबाग; शेतकरी नेते रघुनाथदादांचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन म्हणजे दिल्लीत गाजलेल्या शाहीनबाग आंदोलनासारखे नवी शाहीनबाग आंदोलन आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी कायदे चांगले आहेत, फक्त त्यात दोन-तीन सुधारणा करण्याची आमची मागणी आहे. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी जनप्रबोधन यात्रा रघुनाथदादा पाटील यांनी सुरू केली आहे. नगर तालुक्यातील तुक्कडओढा येथे व कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथे शेतकरी मेळावे त्यांनी घेतले. या मेळाव्यानिमित्त नगरला आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक पटारे, युवा आघाडी अध्यक्ष बच्चू मोढवे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे, राहुरी तालुकाध्यक्ष नारायण टेपाळे, राहुरी युवा अध्यक्ष अमोल मोढे आदी उपस्थित होते.

दिल्लीत आंदोलन करणारे गोवंश हत्या बंदी कायदा, सिलिंग अॅक्ट, लँड अॅक्विझेशन, वन कायदा असे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याबाबत बोलत नाहीत, पण ज्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना लुबाडले जाते, २०-२५ व्यापारी रिंग करून शेतमालाचे भाव जेथे पाडतात, जेथे शेतकऱ्यांचे पैसे चोरीला जातात, व्यापारी जेथे शेतकऱ्यांचे पैसे बुडवतो, त्या बाजार समित्या बंद करून शेतकऱ्यांना शेतमाल खुल्या विक्रीस मुभा देणारा कायदा रद्द करण्याचे आंदोलक म्हणत आहेत व ते चुकीचे आहे, असा दावा करून रघुनाथदादा म्हणाले, हे कायदे परिपूर्ण आहेत, असे आमचेही म्हणणे नाही व त्यात दोन सुधारणा गरजेच्या आहेत. यात म्हटलेल्या एक देश-एक बाजार या घोषणेऐवजी एक जग-एक बाजार अशी घोषणा करून शेतकऱ्यांना जगाची बाजारपेठ खुली केली जावी तसेच शेतमाल विक्रीत मार्केट कमिटी वा खुल्या बाजारात काही वाद झाले तर प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी स्तरावर ते सोडवण्याची केलेली तरतूद अपुरी असून, प्रांताधिकारी-जिल्हाधिकारी स्तरावर झालेला निर्णय मान्य नसेल तर न्यायालयात जाण्याची परवानगी यात असावी व अशा दोन दुरुस्त्या नव्या कृषी कायद्यात केल्या जाव्यात, असे आमचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यास आमची काहीच हरकत नाही. शेतकरी आताही अप्रत्यक्ष कर भरतोच आहे. त्यामुळे आम्हाला (शेतकरी) इन्कमटॅक्स लावा, पण आधी आमचा इन्कम दाखवा, असे आव्हान देऊन ते म्हणाले, अप्रत्यक्ष कराने व शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे जनप्रबोधन यात्रेद्वारे जनजागृती केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post