बाळ पुढे.. पोलिस मागे.. जोरात खो-खो सुरू

नगरला अटकपूर्वही दाखल...त्या कुटुंबांनी मागितले संरक्षण


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खुनातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे आठ दिवस झाले तरी अजून पोलिसांना सापडत नाही. पोलिसांच्या 'कार्यपद्धतीची' परिपूर्ण माहिती असलेला बाळ पुढे पळतोय व त्याच्यामागे पोलिस पळताहेत, असा अनोखा खो-खो खेळ रंगला आहे. दरम्यान, बाळचा अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज नगरच्या न्यायालयात दाखल झाला असून, त्यावर मंगळवारी (८ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. अॅड. महेश तवले व अॅड. संजय दुशिंग हे त्याच्यावतीने न्यायालयासमोर बाजू मांडणार आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य संबंधित असलेल्या जरे कुटुंबाने तसेच मुख्य साक्षीदार असलेल्या शासकीय अधिकारी विजयमाला माने यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. अर्थात पोलिस अधीक्षकांनी या संरक्षण मागणीच्या विषयाला दुजोराही दिला नाही व नकारही दिला नाही.

जरे यांच्या खुनाचा तपास गतीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष खून करणारे व त्यांना त्या कामाची पोटसुपारी देणारे पोलिसांनी पकडले असले तरी मुख्य सुपारी देणारा बाळ ज. बोठे सापडल्याशिवाय या तपासाला गती येण्याची चिन्हे नाहीत. या प्रकरणात अटक केलेल्या पाचही जणांना सोमवारी (७ डिसेंबर) पुन्हा न्यायालयात हजर केले गेले. त्यावेळी झालेल्या तपासाची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. जरे यांच्या हत्येचा प्रयत्न याआधी २४ नोव्हेंबरला करंजी घाटात झाला आहे व त्यात वापरलेले वाहन ताब्यात घ्यायचे आहे तसेच आरोपीच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या तपासणीतून स्पष्ट झालेल्या माहितीची रुजवात करायची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच पाच आरोपींपैकी दोनजणांचा पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणीही पोलिसांनी केली. त्यामुळे न्यायालयाने फिरोज राजू शेख (वय 26 रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24 रा. कडीत फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) या दोघांना न्यायालयीन कोठडी तर आदित्य सुधाकर चोळके (वय 25 रा. तिसगाव फाटा कोल्हार, ता. राहता), सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर, केडगाव अहमदनगर) व ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा. प्रवरानगर ता. राहाता) या तिघांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

खो-खो सुरू
आरोपींपैकी भिंगारदिवे याला बोठे याने जरे हत्येची सुपारी दिल्याचे व त्याने मग इतरांना ती दिल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. त्यामुळे भिंगारदिवे याला मुख्य सुपारी देणारा बोठे पोलिसांना आता हवा आहे. पण त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी आठ दिवसांच्या तपासात खुनात वापरलेले तीक्ष्ण हत्यार, रिव्हॉल्व्हर, मोबाईल असे काही साहित्य जप्त केले आहे तर फोन कॉल्स रेकॉर्ड तपासले आहे. पण बोठे अजून सापडलेला नाही. नगरमध्ये गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचा या खुनाशी संबंध काय आहे, याचे स्पष्टीकरण बोठेला पकडल्यानंतरच होणार आहे. पण त्याचा शोध लागत नसल्याने प्रकरणाच्या तपासाला अपेक्षित गती नाही. त्यामुळे बोठेचा शोध विविध ठिकाणी घेतला जात आहे. बोठे व पोलिसात काहीसा खो-खो सुरू आहे. तो नाशिकला असल्याचे पोलिसांना समजले होते, तेथे पोलिस पोहोचले. पण त्याआधीच तो पळून गेला होता. त्यानंतर नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल करण्याच्या अर्जावर सही करण्यासाठी तो येऊन गेल्याचे सांगितले जाते, पण त्याची खबर नगरच्या न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयाला तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाला लागली नाही. मात्र, नगरच्या न्यायालयात तो प्रत्यक्ष आला होता की नाही, याबाबतही संभ्रम आहे. काहीजणांच्या सांगण्यानुसार त्याने आधीच वकिलपत्रावर व अर्जावर सही करून दिल्याचे सांगितले जाते. अर्थात या सगळ्या संभ्रमात बाळ बोठे हा अजूनही पोलिसांना सापडला नाही वा पोलिस त्याला शोधू शकले नाहीत, हेच सिद्ध होत आहे. ३० नोव्हेंबरच्या रात्री रेखा जरे यांचा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात खून झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बोठेचे फोन ताब्यात घेतले असून, घटनेअगोदर बोठे याचा कोणाशी संपर्क झाला याची माहिती घेऊन त्यादृष्टीने तपासाची सूत्र हलवली जात आहे. ज्यांचा त्याच्याशी संपर्क झाला, त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यातून पथकाला प्राथमिक माहिती हाती लागली व त्या दृष्टीने एक पथक जिल्ह्याबाहेरही गेले. मित्रपरिवार बरोबरच काही नातेवाईक यांच्याकडे सुद्धा पडताळणी पोलिसांकडून झाली, तसेच काही वकिलांशीसुद्धा बोठेचा संपर्क होऊ शकतो, त्यामुळे तसाही तपास सुरू आहे. बोठेच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. पोलिसांनी बोठेच्या संपर्कातील मंडळींचे फोन रेकॉर्ड सुद्धा काढण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. पण एवढे सगळे करूनही बोठे नेमका कोठे आहे, हे पोलिसांना समजत नाही, ही आश्चर्याची बाब झाली आहे.

पोलिस संरक्षण मागणी
रेखा जरे यांच्या समवेत असलेल्या व त्यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांचा जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. दोन दिवस त्यांच्याकडे या प्रकरणाची विचारपूस झाली. या पार्श्वभूमीवर, माने यांनी पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी केली असून, यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यानेही कुटुंबियांसह पोलिस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. आमच्या जीवितास बोठे याच्यापासून धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण या दोन्ही अर्जांना पोलिस अधीक्षक पाटील यांनी अधिकृत दुजोरा दिला नाही. पण त्याचा इन्कारही केला नाही. त्यामुळे तो एक चर्चेचा विषय झाला आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post