आता बोठेला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर शहरातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. खुनाची घटना घडून आता पंधरवडा उलटला तरी बोठे पोलिसांच्या हाती लागला नसल्याने पोलिसांसमोर त्याला जेरबंद करण्याचे आव्हान आहे.

३० नोव्हेंबरला सायंकाळी रेखा जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्या झाल्यावर दोनच दिवसात बोठे पसार झाला. पोलिसांनी जंग जंग पछाडले तरी तो सापडलेला नाही. त्याच्या विषयीच्या सर्व माहितीची खातरजमा पोलिसांकडून तातडीने केली जात असली तरी तो पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे. दरम्यानच्या काळात त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्यावर पोलिसांनी या अर्जाच्या सुनावणीच्यावेळी त्याला हजर ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. पण न्यायालयाने ती अमान्य केल्याने बोठेला दिलासा मिळाला, पण आता त्याच्या मूळ अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होऊन तो न्यायालयाने फेटाळल्याने पोलिसांना आता दिलासा मिळाला आहे. पण आता तो या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने त्याआधीच त्याला ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

भक्कम पुराव्यांचे दावे

बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बाजू मांडताना त्याच्या वकिलांनी, बोठेला सूडाच्या भावनेने या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. पण सरकार पक्षाने बाजू मांडताना, पकडलेल्या आरोपींकडून जप्त केलेली ६ लाख २० हजाराची रक्कम तसेच कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेला पुरावा, तांत्रिक पुरावा व साक्षीदारांचे जबाब यावरून आरोपीचा संबंध स्पष्ट होत असल्याचा दावा केला होता. या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता व बुधवारी तो दिल्यानंतर बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता पोलिसांना पुन्हा एकदा नव्या जोमाने बोठेला पकडण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. पोलिस यात यशस्वी होतात की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

1 Comments

  1. पोलिसांना बाळ नाही सापडणार लवकर

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post