गेला 'बाळ' कुणीकडे.. पोलिस शोधताहेत चोहीकडे..एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे कुठे गेला, याची विवंचना पोलिसांना लागली आहे. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे. पाच पथके जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. पण अद्याप तो पोलिसांना सापडू शकलेला नाही. त्यामुळे जरे हत्याकांडाचा तपास काहीसा ठप्प झाल्याचे चित्र आहे. या खुनाचे कारण बाळ बोठे सापडल्याशिवाय उघड होणार नाही. तसेच या गुन्ह्याशी आणखी कोणाचा संबंध आहे काय? शहरात गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे या खून प्रकरणाशी काही लागेबांधे आहेत काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बाळ बोठेकडे असल्याने तो कुणीकडे गेला, याचा शोध पोलिस चोहीकडे घेत आहेत. तसेच पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 'बाळ'च्या बालिकाश्रम रस्त्यावरील 'जिद्द' बंगल्याची पुन्हा झडती घेऊन त्याचे पिस्तूल जप्त केल्याची माहिती मिळत आहे. तसेच बोठे देशाबाहेर पसार होऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरत पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी करत विमानतळ प्राधिकरणालाही सुचित केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जरे हत्याकांड व त्याच्याशी बाळ बोठेच्या असलेल्या संबंधांबाबत शहरासह जिल्हाभरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. तसेच या खून प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे व्हावी, अशी मागणी होत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाथर्डीचे पदाधिकारी देवीदास खेडकर यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन, बाळ बोठेच्या संपत्तीची चौकशी करावी, ती जप्त करावी. तसेच त्याने घेतलेल्या विविध डिग्र्या, पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर असलेल्या त्याच्या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मागील ३० नोव्हेंबरला रात्री रेखा जरे यांचा नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात खून झाल्यानंतरच या प्रकरणाशी शहरातील बड्या धेंडाचा संबंध असल्याचा दावा 'एएमसी मिरर'ने केला होता. अखेर पोलिस तपासात तो निष्पन्नही झाला. नगरच्या पत्रकारिता क्षेत्रात नामवंत असलेला व बहुतांश युवा पत्रकारांचा आदर्श असलेल्या बाळ ज. बोठे यानेच रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली व मारेकऱ्यांमार्फत ही हत्या घडवून आणल्याने जरे यांच्या हत्येत तोच मुख्य आरोपी असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्टपणे सांगितल्याने नगरच्या माध्यमक्षेत्रात भूकंप झाल्याची स्थिती आहे. राज्यभरातील माध्यम क्षेत्रातही यामुळे खळबळ उडाली. बोठे यांचे पत्रकारितेच्या माध्यमातून पोलिस, प्रशासन, राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, उद्योजकता, वैद्यकीय अशा बहुतांश मोठ्या क्षेत्रातील नामवंतांशी संबंध असल्याने या क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला. त्यांनी नगरमधील आपल्या अन्य मित्रांना फोन करून खात्रीही करवून घेतली व 'असे काही होईल', 'असे वाटत नव्हते', अशी सार्वत्रिक प्रतिक्रियाही उमटली.

दुसरीकडे जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या बोठेचा शोध मागील दोन दिवसांपासून पोलिस घेत असताना अजून त्यात त्यांना यश येत नसल्याने तोही आता एक चर्चेचा विषय झाला आहे. पोलिसांनी य़ा प्रकरणात आतापर्यंत फिरोज शेख (राहुरी), ज्ञानेश्वर शिंदे (श्रीरामपूर), आदित्य चोळके (राहाता), सागर भिंगारदिवे (केडगाव) व ऋषिकेश पवार (राहाता) या पाचजणांना अटक केली आहे. पोलिसांना आता प्रतीक्षा आहे, ती बाळ ताब्यात येण्याची. तो ताब्यात आल्यावर जरे यांच्या खुनाचे कारण आधी स्पष्ट होणार आहे व त्यानंतर हनी ट्रॅपचा या प्रकरणाशी काही संबंध आहे काय, हेही स्पष्ट होणार आहे. तसेच असा संबंध स्पष्ट झाला तर मग हनी ट्रॅपमध्ये कोण-कोण गुरफटले आहेत, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. सध्यातरी पोलिस गेला बाळ कुणीकडे.. शोधू त्याला चोहीकडे.. अशाच विचारांतून अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. बोठेबाबत पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी करून बोठे देशाबाहेर जाऊ नये, या शक्यतेने विमान प्राधिकरणालाही पोलिसांनी सुचीत केल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post