जरे हत्याकांड : बोठेला दिलासा व टांगती तलवारही..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडातील सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याला सोमवारी न्यायालयाकडून दिलासा मिळाला. त्याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीच्यावेळी त्याला हजर ठेवण्याची पोलिसांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. दरम्यान, बोठेच्या मूळ अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी (१५ डिसेंबर) सुनावणी होणार असून, यातील निकालाची टांगती तलवार त्याच्यावर आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी अ‍ॅड. महेश तवले यांच्या माध्यमातून ७ डिसेंबरला जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. यावर सरकार पक्षाने अर्ज केला होता व या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीच्यावेळी बोठेला हजर राहण्यास सांगण्याची विनंती न्यायालयास केली होती. न्यायालयाने याबाबत बोठेच्या वकिलांना म्हणणे मांडण्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकार पक्षाच्या या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने सरकार पक्षाची मागणी अमान्य केली. त्यामुळे बोठेला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. पण आता त्याच्या मूळ अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीच्या निकालाची टांगती तलवार त्याच्यावर आहे.

बोठेचे वकील अॅड. तवले यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीने न्यायालयात का हजर राहावे याचे सक्षम कारण दिलेले नाही, त्यामुळे त्यांना या प्रकरणांमध्ये अटकही करायचे असेल. पण आम्हाला (बोठेला) हजर करायचे असेल तर अटकेपासून संरक्षण द्यावे, असे म्हणणे मांडले. त्यावर जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी पोलिसांची बाजू मांडली. आरोपी बोठे याच्यावर दाखल असणारा गुन्हा गंभीर असून त्याने हजर राहणे गरजेचे आहे व कायद्यामध्ये तशी तरतूद असल्याचेही पाटील यांनी सांगितले. आरोपीला हजर ठेवण्याचे कारण सांगण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा दाखला दिला. त्यानंतर पुन्हा अॅड. तवले यांनी बाजू मांडताना, न्यायालयात आरोपीला हजर करण्याचे कोणतेही ठोस कारण पोलिसांनी दिलेले नाही. इतर कोणते कारण त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आरोपीला हजर ठेवायचे असेल तर त्याला अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात सरकारी पक्षाने बोठेला न्यायालयात हजर ठेवण्याची विनंती करणारा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, बोठेच्या अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आता पोलीस व आरोपीकडून काय बाजू मांडली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

३० नोहेबरला जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे व त्या सर्वांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले आहेत. मात्र, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बोठे पसार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून, त्यात अजूनही यश आलेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post