बोठेची 'संपर्क-साखळी' आता 'रडार'वर.. पोलिसांनी सुरू केली 'त्यांची' चौकशी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पत्रकारितेच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क प्रस्थापित केलेल्या पत्रकार बाळ ज. बोठे याची ही संपर्क-साखळी आता पोलिसांनी रडारवर घेतली आहे. बोठेशी जवळचा संपर्क असलेल्यांची आता चौकशी सुरू झाली आहे. रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला बोठे अजूनही पोलिसांना सापडत नसल्याने त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडून त्याच्याबाबत काही माहिती मिळते का, याची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. या तपासणीत संबंधित व्यक्तीचीही खानेसुमारी केली जात असल्याने शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला हत्या झाली असून, या खुनाचा सूत्रधार बोठे सापडत नसल्याने त्याच्या जवळच्या अनेकांची चौकशी पोलिसांकडून सुरू झाली आहे. रेखा जरे यांच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी उघड झाल्या असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरू केला गेला आहे. बोठे याच्या निकटवर्तीयांची पोलिसांनी चौकशा सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून या चौकशा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे रेखा जरे यांच्या हत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यातून मिळालेल्या जरे यांच्या मोबाईलमधून अनेक माहिती पोलिसांना हस्तगत झाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असताना गेल्या चार ते पाच दिवसापासून अनेकांचे फोन रेकॉर्ड सुद्धा तपासले जात आहे. टेक्निकल पथकाद्वारे याची तपासणी केली जात आहे. तसेच दुसरीकडे जरे यांच्या मोबाईलद्वारे उघड झालेल्या अनेक बाबींचीही खातरजमा केली जात आहे. या मोबाईलमध्ये काय हस्तगत झाले आहे, याचा पूर्ण तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास मात्र सुरू केला आहे.

बोठे गेल्या 22 दिवसांपासून पसार झालेला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याचा पुन्हा एकदा शोध सुरू केला आहे, पोलीस पथकाला मात्र त्याचा अद्याप ठावठिकाणा लागला नाही. या प्रकरणी या अगोदर पाच आरोपींना अटक केली असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बोठेबाबत न्यायालयामध्ये स्टँडिंग ऑर्डर करता प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगितले आहे, येत्या एक-दोन दिवसांमध्ये न्यायालयामध्ये त्या पद्धतीचा अर्जही पोलिसांमार्फत जाणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. बोठे याचा शोध लागला नसल्याने अखेर पोलिसांनी आता वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या निकटवर्तीयांची चौकशी सुद्धा केली जात आहे व काहींचे मोबाईल रेकॉर्डिंगसुद्धा आता तपासण्याची शक्यता आहे. खुनाच्या घटनेच्या दरम्यान कोण बोठेच्या संपर्कात होते, याची सुद्धा चौकशी केली जात आहे. मात्र, पोलिसांनी ही चौकशी करताना अत्यंत गुप्तता पाळली आहे.

1 Comments

  1. श्री. मनोज पाटील साहेब बाळ चे बरेच पोलिस मित्र पण असतील त्यांचा पण पहा कुंपनां ने शेत खाल्ले तर

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post