दादा, आपल्या आईचा कोणीतरी गळा कापलाय.. म्हणत रुणालच्या डोळ्यात दाटले अश्रू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''त्या रात्री मला फोन आला व दादा, आपल्या आईचा कोणी तरी गळा कापलाय...'', असं त्याद्वारे सांगितलं गेलं आणि त्याक्षणी माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला'' असे म्हणत रुणाल जरेच्या डोळ्यांत अश्रू दाटले आणि उपस्थित सारेच सदगदीत झाले. बुधवारी सायंकाळी जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झालेल्या रेखा जरे श्रद्धांजली सभेतील या घटनेनंतर रेखा जरे यांचा मुलगा असलेल्या रुणालने ओक्साबोक्षी रडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी उपस्थित साऱ्यांनीच त्याचे सांत्वन केले. ''अन्याय-अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा'' निर्धारही त्याने यावेळी व्यक्त केला व उपस्थितांनीही या लढ्यात आम्ही तुझ्यासमवेत असल्याची ग्वाहीही दिली. दरम्यान, या श्रद्धांजली सभेत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जरे हत्याकांडाच्या तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला रात्री हत्या झाली आहे. या खुनाचा सूत्रधार असलेला पत्रकार बाळ ज. बोठे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरला रेखा जरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडसह रामरहिम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, स्टुडंट पॉवर फाउंडेशन, अहमदनगर संघर्ष समिती, जनआधार फाउंडेशन, मनसे, अहमदनगर सोशल क्लब, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, फुले ब्रिगेड, नगर शहर काँग्रेस कमिटी, भिंगार शहर काँग्रेस कमिटी व टिपु सुलतान प्रतिष्ठान आदी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवीदास खेडकर, जनआधार फाउंडेशनचे प्रकाश पोटे, सामाजिक निवारा सेवाभावी संस्थेच्या नलिनी गायकवाड, तृतीयपंथी संघटनेच्या काजलगुरू, मंगल भुजबळ, तेली समाज संघटनेचे हरिभाऊ डोळसे, साहेबान जहागीरदार आदींनी भावना व्यक्त करताना रेखा जरे यांच्या सामाजिक कामाचा गौरव केला. हत्येची घटना घडून महिना झाला तरी या प्रकरणातील सूत्रधाराचा पोलिस शोध लावू न शकल्याने नाराजीही व्यक्त झाली. महिलांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या व्यक्तींबरोबरच अशा प्रवृत्तीलाही ठेचून काढण्याची मागणी झाली. पोलिसांनी स्वतंत्र टास्क फोर्स लावून फरार पत्रकार बाळ बोठेला शोधण्याची व त्याच्या सखोल चौकशीचीही मागणी झाली.

फलकांनी वेधले लक्ष
कापड बाजारातून निघालेल्या या कँडल मार्चमध्ये सहभागी झालेल्यांच्या हाती असलेले फलक लक्ष वेधून घेत होते. या फलकांवर....केहता था जो खुदको नगर का नवाब, पोलीस उतरेगी उसका नकाब....न्यायदेवता तूच न्याय कर...पोलीस प्रशासन जिंदाबाद, कातिल नही रहेगा आजाद... जिजाऊ-झाशी-ताराराणी आम्ही सावित्रीच्या लेकी, दाखवून देऊ आमची एकी.... मिटती नही रेखा किसी के मिटाने से, अभी भी जिंदा है सच्चाई के पैमाने पे... अशा आशयांचे फलक यावेळी आंदोलकांच्या हाती होते.

Post a Comment

Previous Post Next Post