अखेर 'हनीट्रॅप' आले रेकॉर्डवर.. बोठेच्या त्या अर्जावर बुधवारी होणार निर्णय

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सहा-सात महिन्यांपूर्वी नगरमध्ये चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप या विषयाकडे पोलिसांनी त्यावेळी दुर्लक्ष केले होते. पण आता हे प्रकरण रेकॉर्डवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याने हनीट्रॅप मालिका छापल्यामुळे जरे खून प्रकरणात अडकवल्याचा दावा केला असल्याने आता पोलिसांनाही हे हनी ट्रॅप प्रकरण रेकॉर्डवर घेऊन त्याची पाळेमुळे खणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले आहेत व बुधवारी (१६ डिसेंबर) यावर न्य़ायालय निर्णय देणार आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निर्णय राखून ठेवला आहे. तो बुधवारी दिला जाणार आहे.

म्हणून अडकवले....मग...ते फोन कॉल्स कसे?
बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर त्याच्याकडून अॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली तर पोलिसांकडून जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला.
आरोपीचे वकील अॅड. तवले यांनी युक्तिवादात म्हटले की, बोठे याने हनी ट्रॅपविषयी वृत्त मालिका लिहिली होती. त्यामध्ये सागर भिंगारदिवे याचा उल्लेख होता. भिंगारदिवे याचा हनी ट्रॅप मालिकेतून बोठेने पर्दाफाश केला होता. त्यामुळे भिंगारदिवे याला बोठे संपर्क का करतील? जरे यांची सुपारी भिंगारदिवेला का देतील? असा सवाल अॅड. तवले यांनी उपस्थित केला. तसेच भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठे यास पोलिस कोठडीची गरज नाही, असेही ते म्हणाले. त्यावर सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला. पाटील म्हणाले की, तपासी अधिकार्‍यांनी जरे यांच्या घरातून जरे यांनी लिहिलेले एक पत्र हस्तगत केले आहे. त्यामध्ये जरे यांनी बोठे माझा मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे लिहिले आहे. 24 नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो प्रयत्नही फसला. त्यानंतर 30 नोव्हेंबरला जरे यांची हत्या करण्यात आली. 24 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर रोजी आरोपी बोठे हा सागर भिंगारदिवे, रेखा जरे यांच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांच्या कॉल रेकॉर्डमध्ये हत्याकांडाच्या दिवशी बोठे हा सातत्याने जरे यांना संपर्क साधून त्यांचे ठिकाण कुठे आहे, त्याची माहिती घेत होता. तसेच त्यानंतर बोठे याचे सागर भिंगारदिवे याला अनेकदा फोन झाले आहेत. याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे बोठे याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्याची मागणी अॅड. पाटील यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर निकाल राखून ठेवला व तो बुधवारी देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, आता जरे यांच्या खुनाशी हनी ट्रॅप प्रकरण संबंधित आहे की नाही, याची खातरजमा पोलिसांना तपासात करावी लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post