'त्यात' दडलंय काय? बोठेचा 'लॉक्ड आयफोन' घडवतोय अनेकविध चर्चा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांड व या खुनाची सुपारी देणारा पसार पत्रकार बाळ बोठे या विषयाच्यादृष्टीने गुरुवारी फारसे काही घडले नसले व पोलिसांना बोठेचा शोध अजूनही लागलेला नसला तरी बोठेचा बहुचर्चित आयफोन मात्र धूम उडवून गेला आहे. या आयफोनचे लॉक पोलिसांना उघडता येत नाही व बोठेशिवाय तो उघडता येणे शक्य नाही. तरीही पोलिसांकडून तो तज्ज्ञांच्या मदतीने उघडण्याचा प्रयत्न आहे. पण हा प्रयत्न फसला तर त्या आयफोनमधील डाटा करप्ट होऊ शकतो, अशा अनेकविध चर्चा या फोनच्या निमित्ताने माध्यम जगतामध्ये रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, या फोनमध्ये दडलंय काय, याच्याही खुमासदार चर्चा आहेत. 

कोणी म्हणते नगरमध्ये मध्यंतरी गाजलेल्या हनी ट्रॅप मालिकेसंदर्भातील पुरावे यात आहेत. तर कोणी म्हणते जरे हत्याकांडाशी संबंधित पुरावे व संभाषण यात आहे. अर्थात पोलिसांकडून याबाबत कोणताही खुलासा केला जात नाही वा अधिकृत माहितीही दिली जात नाही. सगळे अफवांचे बुडबुडे उडत आहेत. पण जरे हत्याकांडाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चांना आणखी एक विषय मात्र मिळाला आहे.

पोलिसांनी बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीच्यावेळीच न्यायालयासमोर या प्रकरणाशी संबंधित सर्व तांत्रिक पुरावे संकलित केल्याचे तसेच सुपारीच्या रकमेतील काही रक्कम हस्तगत केल्याचे स्पष्ट केले आहे. जरे हत्याकांडाशी बोठेचा संबंध असल्याचे त्यातून स्पष्ट होत असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत त्याच्या घरातून जप्त केलेला त्याचा आयफोन आता पोलिसांना आणखी कोणता नवा पुरावा देणार आहे, याची उत्सुकता आहे. त्यामुळेच बोठे कधी सापडतो व हा फोन कधी तो अनलॉक करतो, त्यातून काय माहिती पोलिसांना मिळते, बोठे सापडला नाही तर पोलिस या फोनचे काय करणार, अशा अनेकविध प्रश्न व चर्चांतून बोठेचा आयफोन गाजत राहणार, हे मात्र आता दिसू लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post