एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणात नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. मारेकऱ्यांना सुपारी देऊन जर यांची हत्या घडवून आणल्याच्या गुन्ह्यात बोठे यास पोलिसांनी आरोपी केला आहे. त्याच्या घराच्या झडतीत काही वस्तू पोलिसांना सापडल्या आहेत. पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. एका ज्येष्ठ पत्रकाराचा एका महिलेच्या खुनात हात असल्याच्या घटनेने नगरमध्येच नव्हे तर राज्यभरात मीडियासह राजकीय व विविध क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नगरमध्ये मध्यंतरी गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचा या खून प्रकरणाशी संबंध आहे की नाही, हे अद्याप तपासात निष्पन्न झालेले नाही. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे. मात्र, आधी फरार असलेल्या बाळ बोठेचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा निर्घृण खून 30 नोव्हेंबरला रात्री नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात झाला. या खून प्रकरणमध्ये नगरसह जिल्ह्यात व राज्यभरात प्रसिद्ध पत्रकार बाळ ज. बोठेचा समावेश असून मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या घटनेमध्ये आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. नेमका खून कशामुळे झाला व त्यामागचे काय कारण आहे, हे बोठे यांच्या अटकेनंतरच उघड होणार आहे. बोठेच्या घराची झडती पोलिसांनी घेतली असून, काही वस्तू जप्त केल्या आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली. जरे यांचा या अगोदर 24 नोव्हेंबरलासुद्धा असाच कट करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न याच आरोपीकडून झाला होता, असेही तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याचे सांगून पाटील म्हणाले, या घटनेत आतापर्यंत आधी 3 आरोपी अटक होते व बुधवारी रात्री सागर भिंगारदिवे व ऋषीकेश पवार या दोघांना अटक केली आहे. आरोपी भिंगारदिवे व बोठे यांनी जरे यांच्या खुनाची सुपारी आरोपी चोळकेला व त्याने शेख व शिंदेला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भिंगारदिवेकडून आत्तापर्यंत सहा लाख वीस हजार रुपये हस्तगत केले आहेत. या घटनेमध्ये अन्य काही आरोपींचा समावेश आहे, मात्र तपास जसा पुढे जाईल, त्यानुसार पुढील कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी बोठेच्या शोधासाठी ५ पथके रवाना केली आहेत. या खून प्रकरणांमध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे, त्याचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोणाचे जबाब घेतले, यासंदर्भात आता काहीच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच खुनाचे कारण तपास पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. खुनाची जी सुपारी देण्यात आली होती, त्यातील सहा लाख वीस हजार रुपये आरोपी भिंगारदिवे याला कोल्हापूर येथे अटक केल्यानंतर त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. ही रक्कम आरोपींनी एकमेकांची भेट घेऊन त्यांना रोख देण्यात आली होती, असेही तपासामध्ये उघड झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, डीवायएसपी अजित पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.
नगरमध्ये खळबळ
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या माध्यमातून सांस्कृतिक व सामाजिक कामात सक्रिय असलेल्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणात नगरचा ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाल्यानंतर नगरमध्ये मोठी खळबळ उडाली. महिलेच्या खून प्रकरणाशी संबंध निष्पन्न झाल्याने राज्यभरातील पत्रकारांमध्ये तसेच राजकीय विश्वातही खळबळ उडाली आहे. त्यात पोलिस अधीक्षक पाटील यांनी या प्रकरणाशी आणखीही काहीजणांचा संबंध असल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात तो चर्चेचा विषय झाला आहे. नगरमध्ये गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचा या खुनाच्या घटनेशी संबंध आहे की नाही, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नसले तरी यासंदर्भात जोरदार चर्चा नगरमध्ये रंगली आहे.
Post a Comment