जरे हत्याकांड : बोठेची संपत्ती जप्त करा.. आरोपींना जन्मठेप वा फाशी द्या; लगड यांची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याला फरार घोषीत करून त्याची संपती जप्त करावी तसेच या प्रकरणातील आरोपींना जन्मेठेप वा फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात अॅड. लगड यांनी म्हटले आहे की, येथील बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मास्टर माईंड (मुख्य सुत्रधार) बाळ ज. बोठे घटना घडून २१ दिवस उलटून गेले तरी तो पोलिसांना सापडला नाही. तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आता त्यास फरारी म्हणून घोषीत करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून होत असल्याचे समजले आहे. पोलिसांनी इतर पाच आरोपींना तात्काळ अटक करून तपास चालु केलेला आहे. त्याबद्दल पोलीस खात्याचे अभिनंदन. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा शिक्षणाने डॉक्टरेट असून कायदा पदवीधर देखील आहे. एका वर्तमानपत्रात निवासी संपादक म्हणून काम करताना त्याचा अनेकांशी संबध आलेला असल्याने त्याच्या सर्वत्र चांगल्या ओळखी झाल्या. बाळ ज. बोठे याने हनी ट्रॅप ही मालिका कशाच्या आधारे प्रकाशित केली व त्यातून त्यास काय साधायचे होते, याचीही आपण चौकशी करावी. या मुख्य सुत्रधार याने केलेले कृत्य निश्चितच निषेधार्ह आहे. आता या बोठेस फरार म्हणुन घोषीत करून त्याच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी करून ती ताबडतोब जप्त करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर हा मुख्य सुत्रधार उच्च न्यायालय खंडपीठ-औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज करु शकतो, त्यामुळे त्याठिकाणी देखील आपल्या पोलीस यंत्रणेने डोळ्यात तेल घालून त्याचा अटकपूर्व जामीन कसा फेटाळला जाईल याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, असे अॅड. लगड यांनी निवेदनात नमूद करून पुढे म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपींनी गंभीर असा गुन्हा केला आहे. त्या गुन्ह्यास जन्मठेप किंवा फाशीची तरतुद कायद्याने नमुद केली आहे. अशा परिस्थितीत सदर मुख्य सुत्रधार याचा शोध घेऊन त्यास अटक करुन इतर सर्व आरोपींसह त्याचेविरुध्द न्यायालयात आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे. या प्रकरणातील आरोपींनी गंभीर असा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे ॲडव्होकेट लगड यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post