जरे हत्याकांड : बोठचा पहिला 'मदतगार' पोलिसांनी घेतला ताब्यात?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येचा सूत्रधार व अजूनपर्यंत पसार असलेला पत्रकार बाळ ज. बोठे याला मदत करणारांभोवतीचा फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. बोठेचा घनिष्ठ मित्र असलेल्या डॉ. नीलेश शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सध्या सुरू असून, ती झाल्यावर त्याच्याविरुद्धच्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, बँक फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातही डॉ. शेळके पोलिसांना हवा आहे. पण त्याला आता सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जरे खुनाच्या प्रकरणात घेतले 
असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रेखा जरे खून प्रकरणांमध्ये पोलिसांनी आता अधिक वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा शोध लागत नसल्याने एकीकडे पोलिसांची विविध पथके त्याचा शोध घेत आहे व दुसरीकडे बोठेच्या संपर्कातील व त्याला मदत करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यातूनच मागील चार दिवसांपासून बोठे यांच्या निकटवर्तीयांनी चौकशी पोलिसांनी सुरू केल्या आहे. त्यामुळे या घटनेतील तपासाला अधिक वेग आला आहे. जरे यांच्या खून प्रकरणांमध्ये काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर शुक्रवारी डॉ. शेळके याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे नगर शहरांमध्ये तो चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती सांगण्यास नकार दिला. मात्र, सुपे येथे दाखल गुन्ह्याच्या संबंधाने डॉ. शेळकेला ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीनंतरच त्याचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काय संबंध आहे, हे स्पष्ट होणार आहे. 

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दोन पथके बोठेच्या शोधार्थ पाठवण्यात आलेली होती. मात्र त्या ठिकाणी बोठेऐवजी डॉ. शेळके याचा ठावठिकाणा लागल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून शेळकेच्या चौकशीनंतरच सत्यता समजू शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निकटवर्तीय चौकशीच्या फेऱ्यात
बोठे याच्या निकटवर्तीयांची व सहकाऱ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये बोठे याच्याशी कोणा-कोणाशी संपर्क पूर्वीपासून संपर्क आहे व आताही सुरू आहे, याचा उलगडा चौकशीत केला जात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जरे हत्यांकाडाचा सूत्रधार बोठे याला पसार होण्यास मदत करणारे तसेच अजूनही त्याच्या संपर्कात राहून त्याला मदत करणारे पोलिसांनी आता अजेंड्यावर घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मंडळींवर आता कायदेशीर कारवाईचे नियोजन सुरू झाल्याचे समजते. शिवाय, बोठेचा रिव्हॉल्व्हर परवाना रद्द करण्याच्यादृष्टीनेही पोलिसांनी हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगितले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post