रेखा जरे हत्याकांड : पोलिस झाले हतबल? न्यायालयात केला 'तो' अर्ज


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्यांकाडाचा तपास जवळपास ठप्प झाल्याची स्थिती आहे. त्यांचा सुपारी देऊन खून झाल्याचे पकडलेल्या पाच आरोपींकडून स्पष्ट झाले असले तरी ही सुपारी देणारा पत्रकार बाळ ज. बोठे याचा ठावठिकाणा पोलिसांना अजूनही लागलेला नाही. खुनाची घटना घडून अकरा दिवस झाले तरी बोठे सापडत नसल्याने पोलिस काहीसे हतबल झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, बोठेने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारीही (११ डिसेंबर) सुनावणी झाली नाही. ती आता सोमवारी (१४ डिसेंबर) होणार आहे. या प्रकरणाच्या तपासी अधिकाऱ्याला त्यावेळी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. १४ रोजी होणाऱ्या सुनावणीच्यावेळी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणारा बाळ बोठे याने हजर राहावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने याबाबत बोठेच्या वकिलांना १४ रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती नगरचे मुख्य सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी दिली. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या या प्रकरणाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

३० नोव्हेंबरच्या रात्री पुण्याहून नगरला चारचाकी गाडीतून येत असलेल्या रेखा जरे यांची जातेगाव घाटात हत्या करण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार या पाचजणांना अटक केली आहे. या आरोपींकडून जरे यांची हत्या सुपारी देऊन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्यांना ही सुपारी देणारा पत्रकार बोठे पोलिसांना सापडत नसल्याने या हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बोठेचा शोध पोलिसांनी युद्धपातळीवर हाती घेतला असला तरी तो पोलिसांना हुलकावणी देत असल्याने पोलिस हतबल झाल्याचे दिसू लागले आहे. अशा स्थितीत शुक्रवारी त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पोलिसांनी १४च्या सुनावणीच्यावेळी त्याने न्यायालयात हजर राहावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे आता बोठेचे वकील यावर काय भूमिका मांडतात, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, जरे हत्याकांडात पोलिसांनी पकडलेल्या आदित्य चोळके, ऋषिकेश पवार व सागर भिंगारदिवे या तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पारनेर न्यायालयाने दिल्याची माहिती पारनेरच्या सरकारी वकील अॅड. मनीषा डुबे यांनी दिली. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांना १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यांची ओळखपरेड झाली आहे.

विद्यापीठाचा 'तो' निर्णय
पुणे विद्यापीठाने राज्यशास्त्र विभागातील 'पोलिटिकल जर्नालिझम' या विषयाला संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिलेल्या 'राजकीय पत्रकारिता' या पुस्तकाची मान्यता आता रद्द केली आहे. हे पुस्तक बाळ बोठे याने लिहिले आहे. तो पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नॉमिनेटेड सदस्य आहे व त्याचे हे पुस्तक राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ म्हणून वापरण्यास परवानगी होती. पण बोठे याचे नाव रेखा जरे यांच्या खून प्रकरणात असल्याने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बोठेच्या त्या पुस्तकाची संदर्भग्रंथ म्हणून वापरण्याची मान्यता रद्द केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post