पोलिसांचा 'बाळ-शोध' कसून सुरू; तिघांची पोलिस कोठडी वाढवली; 'यांच्या' चौकशीची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जरे हत्याकांडाचा सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (११ डिसेंबर) सुनावणी होणार असल्याने त्याला त्याआधीच ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहे. तर, जरे हत्या प्रकरणात अटक केलेल्या पाच जणांपैकी तिघांची पोलिस कोठडी ११ पर्यंत वाढवली गेली आहे. तर दोघांचा पोलिस कोठडीचा हक्क राखून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, बाळ बोठे याला मदत करणारांची चौकशी करून त्यांचा जरे हत्येच्या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही, याचा तपास करावा, तसेच बोठेच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी येथील अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे.

जरे हत्याकांडाची सुपारी बोठेने दिल्याचे खुनाची घटना घडल्यानंतर दोन दिवसातच पोलिस तपासात स्पष्ट झाले होते व तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे. त्याला अजूनही यश आलेले नाही. आठवडा उलटला तरी बाळ पुढे व पोलिस त्याच्या मागे असेच चित्र आहे. या दरम्यान त्याने नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला आहे. त्या अर्जाबाबत तपासी अधिकाऱ्याने म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे व ११ रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. मात्र, या मुदतीआधीच बाळला पकडण्याचे कसून प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. जरे हत्येचे कारण अजूनही पोलिसांना शोधता आलेले नाही व त्यासाठी हत्येची सुपारी देणारा बाळ त्यांना हवा आहे. पण सापडत नसल्याने हत्याकांडाचा तपास ठप्प झाला आहे. या प्रकरणात पकडलेल्या पाच आरोपींपैकी ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश पवार व सागर भिंगारदिवे या तिघांना येत्या ११ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे तसेच आदित्य चोळके व फिरोज शेख यांचा पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिल्याची माहिती तेथील सरकारी वकील अॅड. मनीषा डुबे यांनी दिली.

अॅड. लगड यांनी केली 'यांच्या' चौकशीची मागणी
नगरमधील प्रतिथयश वकील अॅड. सुरेश लगड यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन बाळ बोठेच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वृत्तपत्र विक्रेता ते संपादक या प्रवासात त्याने विविध पदांवर काम केले. पण या काळात त्याची आर्थिक स्थिती भक्कम कशाच्या आधारे झाली, याचा शोध घेणे गरजेचे असल्याने त्याच्याकडील चारचाकी व दुचाकी गाड्या, बंगला तसेच ज्ञात-अज्ञात संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे चौकशी करावी, त्याच्या डॉक्टरेटची शहानिशा करावी, पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावरील त्याची नियुक्ती रद्द करावी, तसेच त्याला मदत करणाऱ्या जवळच्या मित्रांची चौकशी करून त्यांचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे, याचीही चौकशी केली जावी. बोठेला अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून कसोशीने प्रयत्न करावेत, अशा मागण्या अॅड. लगड यांनी केल्या आहेत. तसेच बोठेच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे स्वतंत्र पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठवले असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post