'बोठे'च्या अटकपूर्ववर शुक्रवारी सुनावणी; मानेंना मिळाले पोलिस संरक्षण


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिले. येत्या ११ रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, जरे हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार शासकीय अधिकारी विजयमाला माने यांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे तसेच जरे यांच्या कुटुंबियांनीही पोलिस संरक्षणाची मागणी केली असल्याने त्यादृष्टीनेही पोलिसांनी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जाते.

जरे हत्याकांडात पोलिसांनी पाचजणांना पकडले आहे. यातील तिघांना ९पर्यंत पोलिस कोठडी दिली गेली असून, दोनजणांना पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या हत्येची सुपारी देणारा पत्रकार बोठे पोलिसांना सापडलेला नाही. पण त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज अॅड. महेश तवले व अॅड. संजय दुशिंग यांच्या मार्फत दाखल केला आहे. तो मंगळवारी न्यायालयासमोर आल्यावर न्यायालयाने जरे हत्या प्रकरणातील तपासी अधिकाऱ्याचे म्हणणे मागवण्याचे आदेश दिले व ११ रोजी पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे आता ११ रोजी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद या प्रकरणावर होण्याची शक्यता आहे.

मानेंना मिळाले पोलीस संरक्षण

जरे हत्या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदार असलेल्या महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे फरार आहे. तसेच या खुनाच्या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या शासकीय अधिकारी माने यांनी जीविताची भीती वाटत असल्याने त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नावाने अर्ज करीत पोलीस संरक्षण मागितले होते. त्यानंतर मंगळवारी माने यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. दुसरीकडे रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यानेही आरोपी बोठे याच्याकडून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचे सांगत आम्हालाही पोलिस संरक्षण देण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे जरे यांच्या कुटुंबीयांनीही पोलीस संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

पोलिस आहेत त्याच्या मागावर

आरोपी बोठेसंदर्भात काही सुगावा लागला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्याला पकडल्यानंतरच हत्येचे नेमके कारण समोर येणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपी बोठे याचा कसून शोध घेतला जात आहे. त्यासाठी पाच पथके नगरसह विविध जिल्ह्यात शोध घेत आहेत. त्याचा सुगावाही लागला असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, असा दावा पोलिस सूत्रांकडून केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post