जरे हत्याकांड तपास थंडावणार? बोठेच्या शोधावर तपासाची प्रगती अवलंबून


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा तपास आता थंडावण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. कारण, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ ज. बोठे अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. तो जोपर्यंत पोलिसांना सापडत नाही, तोपर्यंत या खुनाच्या तपासाला गती येणार नाही. तशात बोठेच्या जप्त केलेल्या मोबाईलचे लॉकही पोलिसांना अजून उघडता आलेले नाही, त्यामुळे त्यात काय पुरावे आहेत, याचीही माहिती पोलिसांना अजून घेता आलेली नाही. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बोठेकडून दाद मागितली जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

३० नोव्हेंबरला रात्री रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना सध्या न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीला मोबाईल कॉलच्या तांत्रिक माहितीची पुष्टी मिळाल्याने पत्रकार बोठे हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी निष्पन्न करून त्याचा शोध सुरू केला आहे. पण अजूनही तो हाती लागलेला नाही. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या अर्जाच्या सुनावणीच्यावेळी त्याला हजर ठेवण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने अमान्य केल्याने बोठेला दिलासा मिळाला होता. पण नंतर मूळ अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

पोलिस त्याचा निरंतर शोध घेत आहेत, पोलिसांची पथके फिरत आहेत, मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत आहेत, पण अद्याप यश आलेले नाही. बोठे सापडल्याशिवाय रेखा जरे यांच्या हत्येचे कारण स्पष्ट होणार नसल्याने त्याचा शोध पोलिसांच्यादृष्टीने गरजेचा झाला आहे. पण त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिस काहीसे हतबल झाल्याचे दिसू लागले आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आता त्याच्याकडून खंडपीठात धाव घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीनेही त्याची काही माहिती मिळते काय, याची तपासणी सुरू केली आहे. बोठे सापडत नसल्याने जरे हत्याकांडाच्या तपासात फारशी प्रगती दिसत मात्र नाही.

Post a Comment

Previous Post Next Post