बोठे-जरे प्रकरणावर 'कोणाचे तरी' आहे लक्ष?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नीरव मोदी व विजय मल्ल्यासारख्यांविरुद्ध लूकआऊट नोटीस जेव्हढ्या तातडीने जारी झाली नाही, तेवढ्या तातडीने नगरचा पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध जारी होते, म्हणजे कोणीतरी बोठे-जरे प्रकरणात विशेष लक्ष घातल्याचे दिसू लागले आहे. लक्ष घालणारा राजकीय आहे की अन्य कोणी, याची चर्चा आता सुरू झाली आहे. या 'लक्ष घालण्या'तून त्याला नेमके काय साध्य करायचे, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांचा 'बाळ-शोध' अजूनही जारीच आहे. त्याला शोधण्यात अपयश येत आहे. खुनाच्या घटनेत वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला असून रेखा जरे यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, बोठेची वाहने त्याच्याच घरी असल्यामुळे इतर कोणाच्या वाहनाचा वापर पळून जाण्यासाठी केला, यादृष्टीने पोलिसांंनी तपास सुरू केला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला रात्री नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात हत्या झाल्यानंतर व या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे असल्याचे निष्पन्न झाल्यावर सगळीकडे खळबळ उडाली. पोलिसांनी आतापर्यंत दोनवेळा त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील एस्सार पेट्रोलपंपाजवळ असलेल्या जिद्द बंगल्याची झडतीही घेतली आहे. ३ डिसेंबरला पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी बाळ बोठे असल्याचे प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केल्यावर त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (४ डिसेंबर) पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली. त्याने देशाबाहेर पळून जाऊ नये, म्हणून विमान प्राधिकरणाला त्याची माहिती कळवली गेली. पोलिसांनी बोठेबाबत एवढ्या तातडीने उचललेल्या या पावलाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. देशाला आर्थिकदृष्ट्या बुडवून पळून गेलेल्या नीरव मोदी व विजय मल्ल्यासारख्या लोकांसाठी एवढ्या तातडीने लूकआऊट नोटीस जारी झाली नाही, पण बोठेसाठी झाली म्हणजे 'कोणी तरी' बोठे-जरे प्रकरणात 'विशेष लक्ष' घातल्याचे दिसत आहे. नगरमध्येच तशी चर्चा सुरू आहे. बोठे यांनी राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अनेकांना दुखावल्याचे सांगितले जाते, त्यामुळे यापैकी काहींनी या प्रकरणात लक्ष घातले काय, अशीची चर्चा सुरू आहे. अशी मंडळी कोण असावीत व त्यांचा यामागचा हेतू काय, याचेही आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. यातून विविध अफवाही पसरत असून, शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या माध्यम क्षेत्रात तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रात आता बोठे-जरे प्रकरण चर्चेचे झाले आहे. 

पोलिसांनी जरे यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. तसेच बोठे याला फरार होण्यास मदत करणारांचा शोध सुरू केला आहे. बालिकाश्रम रस्त्यावर बोठेच्या घराच्या परिसरात विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत यासाठी घेतली जात आहे. बोठेने कोणाच्या गाडीतून पलायन केले. त्या गाडीची व तिच्या मालकाची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते. त्याचाही शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच मागील काही महिन्यात बोठे यांचा ज्यांच्याशी संपर्क झाला व ज्यांनी त्याच्याशी संपर्क केला, याचीही माहिती संकलित केली जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यापैकी काहींचे जबाब होण्याची शक्यता आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post